वसईतील ज्येष्ठ नागरिकाने दिले दोघांना जीवनदान, अपघातानंतर झाला होता मेंदू मृत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 06:52 PM2017-09-17T18:52:17+5:302017-09-17T18:53:04+5:30
सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वसईच्या गोपालन (वय ७८) यांना सायकलच्या धडकेनंतर त्यांचा मेंदू मृत झाला होता . त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला व गोपालन यांच्या मृत्यूनंतर यकृत व किडनी दानामुळे दोघा रुग्णांना जीवनदान मिळाले.
मीरारोड, दि. 17 - सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वसईच्या गोपालन (वय ७८) यांना सायकलच्या धडकेनंतर त्यांचा मेंदू मृत झाला होता . त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला व गोपालन यांच्या मृत्यूनंतर यकृत व किडनी दानामुळे दोघा रुग्णांना जीवनदान मिळाले.
किडनीच्या व यकृताच्या विविध आजारांनी ग्रस्त लाखो रुग्ण देशात दरवर्षी दगावतात. त्या तुलनेत प्रत्यारोपणाची संख्या जेमतेम पाच टक्के म्हणजेच तीन ते साडेतीन हजार आहे. रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी १ लाख ६० हजार जण प्राण गमावतात. त्यापैकी ७० टक्के अपघाती रुग्ण ब्रेनडेड असतात. अशा रुग्णांच्या नातेवाइकांचे मन अवयवदानासाठी वळवण्यात आले तर किडनी प्रत्यारोपणाचा अनुशेष भरणे शक्य आहे.
१२ सप्टेंबर रोजी गोपालन यांना सायकलच्या धडकेने अपघात झाल्याने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी मीरा रोडच्या खाजगी रुग्णालयात त्यांना आणले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी गोपालन यांना ब्रेन डेड घोषित केले. कुटुंबीयांनी मोठ्या जाणीवेने १४ सप्टेंबरला ब्रेन डेड झालेल्या गोपालन यांचे अवयवदान करण्याचे ठरविले. १५ सप्टेंबर रोजी प्रादेशिक प्रत्यारोपण समन्व्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली व प्रतीक्षायादीप्रमाणे गरजू रुग्णास किडनी व यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.
किडनी प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. राजेश कुमार म्हणाले, " ब्रेन डेडच्या रुग्णांमध्ये दोन्ही किडन्या दोन रुग्णांना देऊन त्यांचे प्राण वाचविता येतात परंतु गोपालन यांचे वय पाहता त्यांच्या दोन्ही किडन्या या एकाच व्यक्तीला देण्यात आल्या. मालाड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय (पुरुष ) रुग्णाला या किडन्या प्रत्यारोपण करण्यात आल्या असून आता त्यांची प्रकृती उत्तम असून नैसर्गीकरीत्या लघवीची प्रकिया सुरु झाली आहे. गेली ३ वर्षे ते डायलासिसवर होते."
तर गोपालन यांचे यकृत प्रत्यारोपण करणारे यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले, " गोपालन यांच्या वयाचा विचार करता त्यांचे यकृत चांगले कार्यरत होते. यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुंबईतील एका ५६ वर्षीय ( पुरुष ) रुग्णावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले असून त्यांची प्रकृतीत सुधारत आहे."
गोपालन यांच्या मुलाने व नातेवाईकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. अवयवदानाच्या जनजागृतीमुळे आणखी जीव आपल्याला वाचविता येतील अशी आशा रवी हिरवाणी यांनी व्यक्त केली .