पोलीस दलातील ‘ती’च्यावरही अन्याय
By admin | Published: June 8, 2017 01:00 AM2017-06-08T01:00:17+5:302017-06-08T01:00:17+5:30
‘महिला या पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिलांनी स्वत:ला सिद्ध केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘महिला या पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिलांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. स्वत:वर आत्मविश्वास ठेवा’ हे शब्द आहेत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे. आपल्या भाषणांमधून महिलांना प्रेरणा देणाऱ्या शुक्लांच्या काळात महिला अधिकाऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील अशी आशा होती. मात्र, नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून महिला निरीक्षकांना संधी देण्याऐवजी विशेष शाखा, वाहतूक शाखेमध्ये ढकलण्यात आले आहे. यामुळे महिला अधिकाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड नाराजी पसरली आहे.
सध्या शहरामध्ये एक उपायुक्त, चार सहायक आयुक्त आणि तब्बल १६ पोलीस निरीक्षक असे २१ वरिष्ठ अधिकारी आहेत. सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आपल्या ‘डॅशिंग’ कामामुळे
चर्चेत राहिलेल्या उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांनाही विशेष शाखा देण्यात आली आहे.
वास्तविक त्यांना आयुक्तालयातील महत्त्वाची पोस्टिंग मिळेल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. तर चतु:शृंगी विभागाच्या सहायक आयुक्त वैशाली जाधव-माने यांनाही बदलण्यात आले आहे. सध्या माने या मॅटमध्ये गेल्या आहेत. तर, वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्त टिपरे यांना अतिक्रमण विभागामध्ये हलविण्यात आले.
गडचिरोलीनंतरचा सर्वांत संवेदनशील जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्गमधून बदलून आलेल्या जयश्री गायकवाड यांना वाहतूक शाखा देण्यात आली आहे. नागपूरहून बदलून आलेल्या उज्ज्वला पिंगळे यांना प्रशासन देण्यात आले आहे. फरासखाना पोलीस ठाण्याहून अलंकार पोलीस ठाण्यामध्ये रेखा साळुंखे यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. शहरामध्ये साळुंके या एकमेव पोलीस ठाणे प्रमुख महिला अधिकारी आहेत.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सध्या ३९ पोलीस ठाणी आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन महानगर पालिकांसह ग्रामीणचा काही भागही पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीला नव्याने जोडण्यात आलेला आहे. एकूण मनुष्यबळापैकी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या तशी अपुरी आहे. वाढती गुन्हेगारी, टोळीयुद्ध, विस्तारणारी हद्द, मालमत्तेचे गुन्हे आणि एकूणच गुन्ह्यांचे बदलते स्वरूप यामुळे पोलीस ठाण्यांचे काम आव्हानात्मक झाले आहे. महिला अधिकारी ही जबाबदारी पेलू शकतील की नाही, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनामध्ये शंका आहेत.
पोलीस महासंचालकांनी केली विचारणा
पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी १९ मे रोजी सर्व पोलीस घटक प्रमुखांना पत्र पाठवून किती महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘एक्झिक्युटिव्ह’ पोस्टिंग दिली, याची विचारणा केली आहे. त्यांची जर इच्छा, आत्मविश्वास आणि क्षमता असेल तर त्यांना पोस्टिंग देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
आपण केवळ महिला सबलीकरणाविषयी बोलतो मात्र, महिलांना पोस्टिंग देत नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. त्यांनी सर्व आयुक्तालयांचे आयुक्त, जिल्ह्यांचे अधीक्षक यांच्याकडून महिलांच्या पोस्टिंगबाबत अहवाल मागवला आहे. हा अहवाल १४ जूनपर्यंत सादर करावयाचा आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांना विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक अशा ‘साईड पोस्टिंग’ देण्यात आल्या आहेत. कर्तृत्व असतानाही केवळ महिला म्हणून डावलले जात असल्याची भावना महिला अधिकाऱ्यांमध्ये वाढू लागली आहे.
‘एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग’पासून वंचित ठेवण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांना स्वत:चे कर्तृत्त्व सिद्ध करण्याची संधी कधी मिळणार, असा प्रश्न आहे.
केवळ महिला म्हणून नियुक्त्यांमध्ये होणारा भेदभाव या अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करणारा ठरत आहे. योग्यतेच्या आधारावर कधी निर्णय घेण्यात येणार, असा प्रश्नही काही महिला अधिकारी उपस्थित करीत आहेत.
स्वत:ला सिद्ध करू इच्छित असलेल्या महिला अधिकाऱ्यांसाठी हा सर्व प्रकार निराशादायक आहे.
नुकत्याच शहर पोलीस दलामध्ये अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना पोस्टिंग दिल्या गेल्या आहेत. तर अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या आहेत. महिला पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यांची धुरा सांभाळण्यात कमी पडतील, या भीतीने अनेक वर्षांपासून त्यांना ‘इन्चार्ज’ म्हणून जबाबदारी देण्यामध्ये टाळाटाळ करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
महिला निरीक्षक पोस्टिंग
रेखा साळुंखेफरासखाना ते अलंकार
अनुजा देशमानेवारजे ते विशेष शाखा
प्रतिभा जोशी गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा
क्रांती पवारवाहतूक शाखा ते विशेष शाखा
कल्पना जाधव विशेष शाखा
शुभदा शितोळे विशेष शाखा
वैशाली चांदगुडे विशेष शाखा
वैशाली गलांडे चतु:शृंगी पोलीस ठाणे
विजया कारंडेविशेष शाखा
दीपाली घाडगेअतिक्रमण
गीता दोरगेनियंत्रण कक्ष
सुचेता खोकले डेक्कन ते वाहतूक
राधिका फडकेसायबर गुन्हे
मनीषा झेंडेसायबर गुन्हे
संगीता पाटीलमहिला साह्य कक्ष
स्वाती थोरात गुन्हे शाखा
माया देवरेवाहतूक
स्वाती देसाई आर्थिक गुन्हे शाखा