अभियांत्रिकीच्या शुल्कात आदिवासींवर अन्याय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2015 01:57 AM2015-07-08T01:57:59+5:302015-07-08T01:57:59+5:30
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर दुजाभाव होत असल्याचा आरोप आदिवासी समाज कृती समितीने केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर दुजाभाव होत असल्याचा आरोप आदिवासी समाज कृती समितीने केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर आदिवासी विभागाकडून महाविद्यालयांना ‘डेव्हलपमेंट फी’ दिली जात असल्याने विद्यार्थ्यांना ते शुल्क भरावे लागत असल्याचे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगमधील (सीओईपी) प्रवेशासाठी एससी संवर्गातील विद्यार्थ्यांकडून ८ हजार ३०० रुपये तर एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांकडून ३४ हजार ५४० रुपये शुल्क आकारले जात आहे. एससी आणि एसटी संवर्गातील घटकांना विशेष आरक्षण असताना अभियांत्रिकी अभ्यासक्रम शुल्कात आदिवासींवर अन्याय होत असल्याचे आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष सीताराम जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
-------
समाज कल्याण विभागाकडून एससी संवर्गातील विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट फी महाविद्यालयाला दिली जाते. मात्र आदिवासी विभागाकडून महाविद्यालयांना केवळ ‘ट्युशन फी’ दिली जाते. त्यामुळे त्यांच्याकडून
२६ हजार २४० रुपये डेव्हलपमेंट फी आकारली जाते. आदिवासी विभागाकडून डेव्हलपमेंट फी मिळाली तर विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले जाईल.- व्ही.बी. गोंटे, लेखा अधिकारी, सीओईपी
--------
महाविद्यालयांच्या शुल्काबाबत तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे (डीटीई) लेखी तक्रार करावी. त्यानंतर योग्य कार्यवाही केली जाईल.- व्ही.जी. तांबे, सहायक संचालक, डीटीई, पुणे विभाग