सीमाभागातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:38 AM2023-03-01T07:38:05+5:302023-03-01T07:38:21+5:30
सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू ॲड. हरीश साळवे मांडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर महाराष्ट्राची बाजू प्रख्यात विधिज्ञ हरिश साळवे मांडणार आहेत. त्यांनी त्यासाठी तत्त्वत : मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव, कारवार भागातील संघटनांनी मंगळवारी आझाद मैदान येथे सीमाप्रश्नावर आंदोलन केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी विधानसभेत या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले. सीमाभागातील जनतेवर कर्नाटक सरकारकडून सुरू असलेला अन्याय थांबविण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय गृहमंत्री अथवा पंतप्रधानांची भेट घ्यावी, अशी सूचना भुजबळ यांनी सरकारला केली.
यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार तीन मंत्र्यांची निवड या समितीसाठी करण्यात आली असून त्यांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल.