आॅनलाइन सातबाऱ्यात असंख्य चुका
By Admin | Published: July 19, 2016 01:52 AM2016-07-19T01:52:10+5:302016-07-19T01:52:10+5:30
शासनाच्या महसूल विभागाकडून देण्यात येणारा सातबारा गेल्या काही महिन्यांपासून आॅनलाइन मिळत आहे.
सिकंदर अनवारे,
दासगाव- शासनाच्या महसूल विभागाकडून देण्यात येणारा सातबारा गेल्या काही महिन्यांपासून आॅनलाइन मिळत आहे. मात्र या उताऱ्यामध्ये अनेक त्रुटी असून जवळपास ८० टक्के सातबारा उतारे हे चुकीचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता पुन्हा या सातबारा उताऱ्यांचे सर्वेक्षण करून अद्ययावत केले जाणार आहेत. या कामास महाडमध्ये सुरुवात झाली असून काही दिवसातच चुकीचे सातबारा पुन्हा दुरुस्त करून आॅनलाइन प्राप्त होणार आहेत.
शासनाच्या डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमानुसार विविध खात्याचे काम आॅनलाइन पद्धतीने सुरु आहे. यामध्ये महसूल खात्याचा देखील समावेश असून महसूल विभागाकडून देण्यात येणारे सातबारा उतारे आता आॅनलाइन मिळू लागले आहेत. गावागावात असलेल्या तलाठी कार्यालयातील नोंदीनुसार सातबारा आॅनलाइन टाकण्यात आले. हे काम करत असताना अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. यामुळे आॅनलाइन सातबारा घेतल्यानंतर देखील सातबाऱ्यातील तांत्रिक चुकांमुळे नागरिकांना पुन्हा तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे महसूल विभागाकडून या सातबारा उताऱ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून या कार्यक्रमाला महाडमध्ये गुरुवापासून सुरुवात झाली आहे. तालुक्यातील १ लाख ७४ हजार सातबारा उतारे प्रिंट करून हस्तलिखित सातबारा उतारे समोर ठेवून अद्ययावत केले जाणार आहे.
नागरिकांना आतापर्यंत मिळत असलेले सातबारा हे अद्ययावत नव्हते. यामध्ये अनेक त्रुटी होत्या, फेरफार नसणे, पोटखराबा नसणे, पीकपाणी नोंद नसणे, बिनशेती उल्लेख नसणे आदि कारणास्तव नागरिकांना पुन्हा तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. चुकांच्या दुरुस्तीचे काम आता शेवटच्या टप्प्यातून केले जाणार आहे. आता सातबारे अपग्रेडेशन होत असून या नोंदी आता कायम केल्या जाणार आहेत.
>३० जुलै अंतिम तारीख
आॅनलाइन सातबारा दुरुस्ती करताना प्रशासनाला इंटरनेटचा कमी वेग त्रासदायक ठरत आहे. शासनाने स्थानिक प्रशासनाला ३० जुलै ही अंतिम तारीख दिली असली तरी इंटरनेट कायम खंडित होणे, वेग मंदावणे आदि कारणामुळे एक सातबारा दुरुस्त करताना तासभर वेळ जात आहे. यामुळे या कामी नेमलेले कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
सातबारा उताऱ्यांचे काम तालुकास्तरावर एकाच ठिकाणी होत असल्याने तलाठी महाड महसूल कार्यालयात एकत्रित काम करणार आहेत. यामुळे गावातील ग्रामस्थांच्या विविध कामांना विलंब होईल. ग्रामस्थांनी आपली कामे महाड महसूल कार्यालयाशी संपर्क साधून करून घ्यावीत.
-संदीप कदम, तहसीलदार, महाड
33 तलाठी सध्या काम करत असून ३० जुलैपर्यंत हे काम चालणार आहे. नवीन कार्यक्रमानुसार जुने हस्तलिखित आणि संगणकीय सातबारे यांची पडताळणी होईल.