पीक कर्जासाठी अभिनव आंदोलन

By Admin | Published: July 15, 2016 04:51 PM2016-07-15T16:51:07+5:302016-07-15T16:51:07+5:30

तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हतबल शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी येथील तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.

Innovative movement for crop loans | पीक कर्जासाठी अभिनव आंदोलन

पीक कर्जासाठी अभिनव आंदोलन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

शिरपूर, दि. 15 - तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हतबल शेतकऱ्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी येथील तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.
गेल्या १६ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़ त्यामुळे अरेरावी, मनमानीपणे वागून कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व कायदेशीर कारवाई करून त्यांना शासन व्हावे अन्यथा १० दिवसानंतर हतबल व पीडित शेतकरी अर्धनग्न उपोषणास बसतील, असा इशारा येथील तहसिलदारांना यापूर्वी म्हणजे ५ जुलैला देण्यात आला होता़
या संदर्भात निवेदन देवून ९ दिवस उलटले तरी शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी आजतागायत अरेरावीने व मनमानी कारभार करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेले नाहीत, तसेच पीडित शेतकऱ्यांच्या निवेदनाची साधी दखल सुध्दा घेतलेली नाही़
गेल्या ३-४ वर्षापासून सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे़ अशाही परिस्थितीत खचून न जाता परिस्थितीशी सामना करीत मागील नुकसान सहन करून पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी पीक पेरणी, बियाणे खरेदी, पाईपलाईन, बोअरवेल, फवारणी, औषधी, खते, वीज पुरवठा, यांत्रिकी व मजुरी याकरीता शेतकऱ्यांना आर्थिक निकड निर्माण झाली आहे़
बँकांमध्ये शेतकरी पीक कर्जासाठी जावूनही संबंधित अधिकारी दाद देत नाहीत, अरेरावीने वागतात, आम्ही पीक कर्ज देत नाही, साहेब नाहीत, नंतर या, बँकेचा कोटा पूर्ण झाला, तुमचे क्षेत्र आमच्या बँकेच्या अंतर्गत येत नाही, आदिवासींना पीक कर्ज देता नाही, जुन्या ग्राहकास फक्त कर्ज देतो, तेही सध्या बंद आहे, बँकेचे आॅडिट सुरू आहे, एका महिन्यानंतर या अशी एक ना हजार कारणे सांगून पीक कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची बॅँक अधिकाऱ्यांकडून बोळवण केली जात आहे़ त्यामुळे शेतकरी हतबल ठरले आहेत.
शासनाने शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज योजना जाहीर कराव्या, मात्र ज्यांच्या मार्फत त्या राबविल्या जातात त्या बँकांच्या उदासिनतेचा परिणाम म्हणून शेतकरी त्या पासून आजही वंचित राहिलेला आहे़ अखेर हतबल शेतकऱ्यास सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे़ परिणामी सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशीवेळ शेतकऱ्यांवर येवू नये म्हणून झोपेचे सोंग घेणाऱ्या संवेदनाहीन बॅँक अधिकारी व शासनास जागे करण्याची वेळ आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
गेल्या नऊ दिवसांत काही हालचाल न झाल्याने येथील तहसील कार्यालयासमोर पीडित शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले़ या आंदोलनाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख भरतसिंग राजपूत, शहरप्रमुख कन्हैय्या राजपूत, शिरपूर विकास आघाडीचे चंदनसिंग राजपूत, निलेश गरूड, मनसेचे मयूर राजपूत, स्वप्नील जाधव यांच्यासह बहुतांश कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Innovative movement for crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.