मोहटा देवस्थानची चौकशी करावी
By admin | Published: March 8, 2017 12:45 AM2017-03-08T00:45:09+5:302017-03-08T00:45:09+5:30
मोहटा देवस्थानमध्ये विश्वस्तांनी १ किलो ८९० ग्रॅम सोने मंदिरात पुरून अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे. त्यामुळे तत्काळ स्वतंत्र समिती नियुक्त करून त्याची चौकशी
अहमदनगर : मोहटा देवस्थानमध्ये विश्वस्तांनी १ किलो ८९० ग्रॅम सोने मंदिरात पुरून अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे. त्यामुळे तत्काळ स्वतंत्र समिती नियुक्त करून त्याची चौकशी करा आणि विश्वस्तांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मंगळवारी येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.
‘लोकमत’ने ‘मोहट्याची माया’ या मालिकेतून देवस्थानमधील सुवर्ण घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर ‘अंनिस’ने प्रशासनाला निवेदन सादर केले. देवीच्या मंदिरात चांगली ऊर्जा निर्माण व्हावी, या अंधश्रद्धतेतून या देवस्थानने मंदिरात सोने पुरले. सोन्याची सुवर्ण यंत्रे तयार करण्यासाठी पंडिताला २४ लाख ८५ हजार रुपयांची मजुरी देण्यात आली. या देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष आहेत.
‘अंनिस’ न्यायालयीन लढा देणार
देवस्थानमधील सुवर्ण घोटाळ्याबाबत मोहटा ग्रामस्थांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयीन लढ्यात ग्रामस्थांची साथ करणार असल्याचे अंनिसचे अविनाश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)