मंत्री खोतकरांच्या तूर खरेदीची चौकशी करा
By admin | Published: May 24, 2017 03:13 AM2017-05-24T03:13:34+5:302017-05-24T03:13:34+5:30
शिवसेनेचे नेते आणि मंत्री वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल ३७७ क्विंटल तूर दोन दिवसांत कशी खरेदी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल ३७७ क्विंटल तूर दोन दिवसांत कशी खरेदी केली, असा सवाल करत या तूर खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
जालना जिल्ह्यात एकूण साडेचार लाख टन तुरीचे उत्पादन झाले असताना एक लाख टनापेक्षा अधिक तूर ही केवळ ८०० लोकांनी विकली आहे. तूर खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केल्यानंतर सरकारने चौकशी समिती नेमली. या समितीकडे या ८०० लोकांची यादी दिली असून त्यात खोतकर यांचे नाव आहे. खोतकर कुटुंबीयांनी १४ फेब्रुवारी रोजी १८७ क्विंटल आणि १८ फेब्रुवारी रोजी १९० क्विंटल अशी एकूण ३७७ क्विंटल तूर दोन दिवसांत नाफेडच्या खरेदी केंद्रावर विकली. या प्रकरणाची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पातळीवर सुरू आहे. मात्र एका विद्यमान मंत्र्यांची एवढ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी होईल का, अशी साशंकताही सावंत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मंत्री खोतकर यांनी या आरोपांचा इन्कार केला असून ही सर्व तूर आपल्या शेतातील असल्याचे म्हटले आहे.