मुख्यमंत्री कार्यालयातील चहा घोटाळ्याची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:20 AM2018-03-30T06:20:24+5:302018-03-30T06:20:24+5:30
मुख्यमंत्री कार्यालयातील चहा घोटाळ्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेले स्पष्टीकरण म्हणजे सत्य लपविण्याचा केविलवाणा
मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातील चहा घोटाळ्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेले स्पष्टीकरण म्हणजे सत्य लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. चहा खर्चात झालेल्या ५७७ टक्के वाढीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निरूपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार २०१५-१६ साली मुख्यमंत्री कार्यालयात चहा आणि अल्पोपहारावर ५७ लाख ९९ हजार १५६ रुपये खर्च झाला होता. तो खर्च २०१६-१७ मध्ये एक कोटी २० लाख ९२ हजार ९७२ रुपयांवर पोहचला, असे निरुपम यांनी सांगितले. २०१७-१८ या वर्षात तर चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी ३४ लाख ६४ हजार ९०५ रुपये खर्च झाला. म्हणजे गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचे निरुपम म्हणाले.
यावर हा केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी लागणारे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठी होणारा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे.
निरूपम यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण फेटाळून लावतानाच या खर्चाचा संपूर्ण तपशील जाहीर करण्याची तसेच प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.