रायगड जिल्ह्यात मनाई आदेश जारी
By admin | Published: November 3, 2016 02:50 AM2016-11-03T02:50:13+5:302016-11-03T02:50:13+5:30
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून १६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी
अलिबाग : रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून १६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात माथेरान, खोपोली, पेण, अलिबाग, मुरु ड, रोहा, श्रीवर्धन, महाड या नगरपरिषदेच्या निवडणुका २७ नोव्हेंबर २०१६ रोजी होणार असून या निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या विविध कलमान्वये हा मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, काठ्या किंवा लाठ्या अगर शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे किंवा बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, चित्रे, चिन्हे अगर कोणतीही तत्सम वस्तू, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे ही कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.