भूखंडाची विक्री करून देण्याची बतावणी, गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल
By Admin | Published: September 27, 2016 08:48 PM2016-09-27T20:48:40+5:302016-09-27T20:48:40+5:30
भूखंडाची विक्री करून देण्याची बतावणी करून सहा वर्षांत अनेकांकडून लाखो रुपये हडप केल्याची तक्रार मिळाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 27 - नारीच्या लेआऊटमधील भूखंडाची विक्री करून देण्याची बतावणी करून सहा वर्षांत अनेकांकडून लाखो रुपये हडप केल्याची तक्रार मिळाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले. जगदीशसिंह इंदरसिंह (वय ७५) आणि सूर्यभान विठोबाजी गवळी (वय ७५) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी सुरू केलेल्या अलाईड एम्लॉईज को-आॅपरेटीव्ह सोसायटीचे अनंतनगरात कार्यालय आहे.
सदरमधील आझाद चौकात राहणारे संजय मुरलीधर डोंगरवार यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, जगदीशसिंह आणि गवळी यांनी डिसेंबर २०१० ला मौजा नारी येथे खसरा क्रमांक १२३/ १ आणि ११५/ १ येथे लेआउट टाकून तेथे भूखंड विकायचे असल्याची अनेकांना बतावणी केली. त्यामुळे डोंगरवार यांच्यासह अनेकांनी तेथे भूखंड विकत घेण्यासाठी आरोपींसोबत त्यांच्या अनंतनगरातील कार्यालयात संपर्क केला. २४ डिसेंबर २०१० पासून त्यांच्याकडून रक्कम गोळा केल्यानंतर आतापर्यंत आरोपींनी भूखंडाचे विक्रीपत्र संबंधितांना करून दिले नाही.
६ वर्षात अनेकदा टाळाटाळ झाल्यामुळे भूखंड विकत घेण्याचा सौदा करणा-यांनी चौकशी केली असता ती जमीन दुस-याच व्यक्तीच्या नावे असल्याचे उघडकीस आली. आरोपींनी फसवणूक केल्याची भावना झाल्यामुळे डोंगरवार आणि अन्य १६ लोकांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रदीर्घ चौकशीनंतर पोलीस उपनिरीक्षक केदारे यांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या माहितीनुसार, जगदीशसिंह आणि गवळी यांनी १७ लोकांकडून सुमारे ३० लाख रुपये घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.