खडसे जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी सुरू
By admin | Published: June 15, 2016 03:23 AM2016-06-15T03:23:13+5:302016-06-15T03:23:13+5:30
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जावयाने भोसरी येथील एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची चौकशी करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती
पुणे : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जावयाने भोसरी येथील एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची चौकशी करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
राव यांनी सांगितले की, जमीन खरेदीचा दस्त नोंदविला गेला आहे. परंतु या खरेदी खताची नोंद सातबाऱ्यावर करणे आणि फेरफार नोंदविणे याबाबी महसूल विभागाशी संबंधित आहेत. एमआयडीसीने या नोंदीबाबत आक्षेप घेतल्यास त्याची पडताळणी करावी लागणार आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामध्ये फेरफार नोंद करताना एमआयडीसीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
एमआयडीसीने हरकत घेतल्यास खडसे यांच्या अडचणी वाढतील. भोसरी एमआयडीसीतील खडसे प्रकरणानंतर रांजणगाव एमआयडीसीमध्येही इतर हक्कामध्ये एमआयडीसीचे नाव इतर हक्कामध्ये असताना जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेत. त्यामुळे जिल्ह्यात एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच अन्य प्राधिकृत संस्थांनी संपादित केलेल्या जमिनी व त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदीची पडताळणीसाठी जिल्ह्यात खास मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले. एमआयडीसीच्या जागांवर कारखाने सुरु असून जमिनी मूळ शेतकऱ्यांच्याच नावावर असल्याचे प्रकरणे समोर आली. या जमिनी एमआयडीसीच्या मध्यभागी असल्याने संशय निर्माण होतो, म्हणून मूळ कागदपत्रांची पडताळणी करून निर्णय घेऊ असे राव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)