मोहटा देवस्थानची चौकशी सुरू
By Admin | Published: January 13, 2017 04:17 AM2017-01-13T04:17:35+5:302017-01-13T04:17:35+5:30
राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहटादेवी देवस्थानची अखेर धर्मादाय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे
सुधीर लंके /अहमदनगर
राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहटादेवी देवस्थानची अखेर धर्मादाय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. नगरच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील निरीक्षकांवर चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली असून, अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. देवस्थानच्या इतिहासात प्रथमच अशी चौकशी होत आहे.
जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या मोहटादेवी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने अनेक आक्षेपार्ह निर्णय घेतले आहेत. या संदर्भातील सविस्तर वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर भाविकांना धक्का बसला. देवस्थानला भाविकांकडून दान केले जाणारे सोने व चांदी शुद्धीकरणासाठी पाठविताना नियमानुसार कार्यवाही केली जात नाही. २० किलो शुद्ध सोन्याची बँकेत गुंतवणूक करण्याचा ठराव देवस्थानने १ मार्च २०१५ रोजी केला होता. मात्र, या गुंतवणुकीचे प्रमाणपत्र विश्वस्तांना पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे हे सोने नेमके कोठे आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देवस्थानची विश्वस्त भरतीप्रक्रिया मनमानी पद्धतीने केली जाते. निविदा प्रक्रिया न राबविताच कामे केली जातात. सह्यांचे अधिकारही मुख्य कार्यकारी अधिकारी व लेखापालच वापरतात, या सर्व बाबींची चौकशी होण्याची शक्यता आहे.
सुवर्ण यंत्रांबाबत मौन
देवस्थानने वेगवेगळ्या मूर्तींखाली १ किलो ८९० ग्रॅम सोन्याची यंत्रे पुरली आहेत. या वर्षीच्या नवरात्रौत्सवातही ही यंत्रे पुरण्यात आली. या सुवर्ण यंत्रांची मजुरी व पूजाविधीचा खर्चच २४ लाख ८५ हजारांच्या घरात आहे. हा खर्च अधिकृत आहे का, सोने कोणत्या कायद्यानुसार पुरले? याचा खुलासा विश्वस्त मंडळ करत नाही. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर मंडळाची एक बैठक झाली. मात्र त्यानंतरही सुवर्ण यंत्रांबाबत मौन बाळगण्यात आले आहे.