शिर्डी विमान अपघाताची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:30 AM2018-05-23T00:30:44+5:302018-05-23T00:30:44+5:30
सेवा सुरळीत; दिल्लीहून विशेष पथक दाखल
शिर्डी : येथील विमानतळाच्या धावपट्टीवरून सोमवारी सायंकाळी घसरलेले विमान मंगळवारी दुपारी तीन वाजता बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी दिल्लीहून आलेल्या द्विसदस्यीय विशेष पथकाने अपघातस्थळाची पाहाणी केली. अखेर दुपारनंतर विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
विमान धावपट्टी सोडून बाहेर गेल्याने सोमवारी झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी दिल्ली येथील नागरी उड्डयन संचालनालयाचे दोन अधिकारी मंगळवारी सकाळीच शिर्डी विमानतळावर दाखल झाले़ दुपारी तीन वाजेपर्यंत पंचनामा केल्यावर ट्रॅक्टरने विमान बाहेर काढून पार्किंगला लावले़ विमानाला काही झाले नसले तरी तपासणीनंतरच त्याचा पुन्हा वापर करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी धावपट्टी, सुरक्षेच्या सुविधांचीही पाहणी केली़ विमान उतरताना बे्रक कोठून लावले, याबाबत जाणून घेत वैमानिकाचीही त्यांनी कसून चौकशी केली़ दरम्यान सोमवारी रद्द झालेले हैदराबादचे विमान प्रवाशांअभावी दुपारी एक वाजता रवाना झाले़ यानंतर पावणे पाच वाजता मुंबईहून एक विमान प्रवाशांना घेऊन आले़ बुधवारपासून नेहमीप्रमाणे हैदराबाद व मुंबईसाठीची विमानसेवा सर्वसामान्यपणे सुरू होणार आहे़