अमळनेरमधील रावसाहेब दानवेंच्या भाषणाची चौकशी होणार
By admin | Published: December 22, 2016 03:59 AM2016-12-22T03:59:42+5:302016-12-22T03:59:42+5:30
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पैठणमधील लक्ष्मीचे स्वागत करण्याच्या व्यक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल
जळगाव : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पैठणमधील लक्ष्मीचे स्वागत करण्याच्या व्यक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असताना अमळनेर येथील प्रचार सभेतील त्यांच्या भाषणाची सीडी व अहवालही मागविण्यात आला आहे.
पैठण येथील वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने रावसाहेब दानवे यांच्या राज्यभर झालेल्या प्रचार सभांबाबत सीडी व अहवाल मागितला आहे. अमळनेर येथील सभेत नगपरिषदेस १०० कोटींचा निधी हवा असेल तर भाजपाचा नगराध्यक्ष निवडून द्या, आणि भाजपाचा नगराध्यक्ष झाल्यास, केंद्रात खासदार ए. टी. पाटील यांना तर राज्यात आमदार स्मिता वाघ यांना मंत्रिपदे देण्यात येतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
मात्र लक्ष्मीदर्शनाबाबत त्यांनी काही उल्लेख करून आचारसंहितेचा भंग केला आहे का?, याबाबत त्यांच्या भाषणाची सीडी तपासण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी तथा तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड हे निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविणार आहेत. (प्रतिनिधी)