आयएनएस गोदावरी निवृत्त

By admin | Published: December 24, 2015 02:07 AM2015-12-24T02:07:13+5:302015-12-24T02:07:13+5:30

नौदलाच्या शिरपेचातील मानाचा तुरा मानली जाणारी आणि संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका ‘आयएनएस गोदावरी’ बुधवारी निवृत्त झाली.

INS Godavari retired | आयएनएस गोदावरी निवृत्त

आयएनएस गोदावरी निवृत्त

Next

मुंबई : नौदलाच्या शिरपेचातील मानाचा तुरा मानली जाणारी आणि संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका ‘आयएनएस गोदावरी’ बुधवारी निवृत्त झाली. तब्बल ३२ वर्षे नौदलात चोख कामगिरी बजावणाऱ्या या युद्धनौकेच्या निवृत्तीने गौरवशाली इतिहासाची सांगता झाली.
मुंबईतील नौदलाच्या गोदीत मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने गोदावरीच्या निवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ठीक ६ वाजून ७ मिनिटांनी जवानांनी नौकेवरील नौदलाचा पांढरा ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवून तो गोदावरी युद्धनौकेचे कप्तान विशाल रावत यांच्याकडे सुपुर्द केला. कप्तान रावत यांनी ‘लास्ट पोस्ट’च्या सुरावटीवर पश्चिम मुख्यालयाचे चिफ स्टाफ आॅफीसर व्हाइस अ‍ॅडमिरल हरी कुमार यांना कडक सॅल्यूट ठोकत ‘आयएनएस गोदावरी डि-कमिशन्ड सर’ असे रिपोर्ट केले. टपाल खात्याचे महाराष्ट्र विभागाचे प्रमुख ई. व्ही. राव यांच्या हस्ते याप्रसंगी विशेष तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
माझगाव गोदीत ३ नोव्हेंबर १९७८ रोजी या युद्धनौकेच्या बांधणीचे काम हाती घेण्यात आले. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर १० डिसेंबर १९८३ रोजी सभारंभपूर्वक भारतीय नौदलात तिचा समावेश करण्यात आला.
श्रीलंकेत १९८८ मध्ये झालेले नौदलाचे आॅपरेशन ज्युपिटर, सोमालियात भारतीय लष्कराच्या मदतीसाठी १९९४ मध्ये राबवलेले आॅपरेशन शिल्ड आणि आॅपरेशन बोल्स्टर आणि एडनच्या समुद्रात सोमालिया चाच्यांविरुद्ध राबवलेल्या धडक मोहिमांमध्ये या युद्धनौकेने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

Web Title: INS Godavari retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.