आयएनएस वेला नौदलात दाखल; पश्चिम विभागात कार्यरत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 01:05 PM2021-11-26T13:05:49+5:302021-11-26T13:08:25+5:30

फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव डॉकमध्ये स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्यांची बांधणी सुरू आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, खंदेरी आणि करंज या तीन पाणबुड्या नौदलात दाखल करण्यात आल्या होत्या.

INS Vela enlisted; Sophisticated system: Working in the western division | आयएनएस वेला नौदलात दाखल; पश्चिम विभागात कार्यरत 

आयएनएस वेला नौदलात दाखल; पश्चिम विभागात कार्यरत 

googlenewsNext

मुंबई: हेरगिरीसाठीची अत्याधुनिक यंत्रणा, लांबपल्ल्याचे पाणतीर आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी पाणबुडी आयएनएस वेला गुरुवारी नौदलात समाविष्ट करण्यात आली. मुंबईतील नौदल गोदीत नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते ही पाणबुडी औपचारिकपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. नौदलाच्या पश्चिम विभागाच्या ताफ्यात ही पाणबुडी कार्यरत असेल.

फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव डॉकमध्ये स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्यांची बांधणी सुरू आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, खंदेरी आणि करंज या तीन पाणबुड्या नौदलात दाखल करण्यात आल्या होत्या. आज या श्रेणीतील चौथी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात आली आहे. नौदल गोदीतील या सोहळ्यास नौदलप्रमुख करमबीर सिंग यांच्यासग खासदार अरविंद सावंत, पश्चिम विभागाचे प्रमुख व्हॉइस ॲडमिरल आर. हरी कुमार, एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हॉइस अडमिरल (निवृत्त) नारायण प्रसाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

याआधीच्या वेला या रशियन बनावटीच्या फॉक्सट्रॉट श्रेणीच्या आणि २००९ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पाणबुडीचा कर्मचारीवर्ग सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. अकरा महिन्यांच्या कठोर सागरी परीक्षणानंतर आयएनएस वेला नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या पाणबुडीमुळे नौदलाची क्षमता निश्चितच वाढली असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अशी आहे आयएनएस वेला -
या पाणबुडीची लांबी साधारण ६७.५ मीटर तर उंची १२.३ मीटर इतकी आहे. समुद्रात तीनशे ते चारशे मीटर खोलपर्यंत डुबकी लावण्यास ही पाणबुडी सक्षम आहे. तर यात बसविलेल्या यंत्रांचा आवाज कमीत कमी असल्याने समुद्रात फारसा आवाज न करता दबा धरून शत्रूला टिपण्याची शक्ती या पाणबुडीत आहे. दहा अधिकारी आणि २५ नौसैनिक या पाणबुडीवर तैनात असतील तर तब्बल ४५ दिवस खोल समुद्रात मोहीम राबविण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. अत्याधुनिक सोनार प्रणालीमुळे समुद्रातील छोट्या हालचाली टिपण्यास ही पाणबुडी सक्षम आहे. लांबपल्ल्याची पाणसुरुंग, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक सोनार आणि सेन्सर संच, प्रगत शस्त्रास्त्रे, रडार, सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टमने सुसज्ज असलेली ही पाणबुडी नौदलाची शक्ती वाढविणारी आहे.

वेला नावाचा इतिहास
भारतीय नौदलात १९७३ ते २००९ दरम्यान कार्यरत रशियन बनावटीची आयएनएस वेला ही पाणबुडी कार्यरत होती. वेला श्रेणीतील ही प्रमुख पाणबुडी होती. हेच नाव आणि निशाण नव्या पाणबुडीच्या माध्यमातून कायम ठेवण्यात आले आहे. भारतीय समुद्रात आढळणाऱ्या स्टिंग रे प्रजातीच्या माशावरून या पाणबुडीला वेला हे नाव देण्यात आले आहे. मराठी मच्छीमारांमध्ये पाकट या नावाने ओळखला जाणारा हा मासा आक्रमक असतो. या माशाच्या शेपटीचा दंश अत्यंत घातक मानला जातो. शिवाय, शत्रूपासून बचावासाठी समुद्री वातावरणानुसार रंगरूप बदलण्याची विशेष क्षमता या माशात आहे. या सर्व वैशिष्ट्यांवरूनच या पाणबुडीला वेला हे नाव देण्यात आले आहे.
 

Web Title: INS Vela enlisted; Sophisticated system: Working in the western division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.