सोमय्यांची तीन तास चौकशी; आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका निधी घोटाळा प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 08:42 AM2022-04-19T08:42:59+5:302022-04-19T08:45:02+5:30

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

INS Vikrant warship fund scam case Somaiya's three-hour interrogation | सोमय्यांची तीन तास चौकशी; आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका निधी घोटाळा प्रकरण 

सोमय्यांची तीन तास चौकशी; आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका निधी घोटाळा प्रकरण 

Next


मुंबई :  आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून अपहार केल्याच्या आरोपप्रकरणी सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. तीन तासांच्या चौकशीअंती त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. चौकशीनंतर बाहेर पडताच, सोमय्या यांनी, मी तपासाला पूर्ण सहकार्य केले आहे. तसेच माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. सत्याचाच विजय होईल, असे सांगितले.

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  माजी सैनिक बबन भोसले यांनी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  दाखल गुह्यांतील रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी दोघांनाही समन्स बजावत चौकशीला बोलावले होते. 

मात्र दोघेही चौकशीला हजर राहिले नाहीत. यावेळी त्यांच्या वकिलाने ५ पानांचा जबाब आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता.  त्यात विक्रांत वाचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांच्या सर्व माहितीसह राष्ट्रपती व राज्यपाल यांच्याशी केलेले पत्रव्यवहार, त्याबाबत करण्यात आलेले ट्वीटदेखील सादर करण्यात आले. त्यावेळची छायाचित्रे व निवेदनेही दाखवण्यात आली. त्या छायाचित्रात संजय राऊत स्वत: असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले होते.   

त्यापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना अटकेपासून संरक्षण देत, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश दिल्यानंतर,  सोमय्या हे सोमवारी सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाले. यावेळी त्यांच्याकडील काही कागदपत्रेही त्यांनी तपास अधिकाऱ्यांना दिली आहेत. 
त्यांनी दिलेल्या माहितीच्याआधारे आर्थिक  गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. तसेच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकते, असेही अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
 

Web Title: INS Vikrant warship fund scam case Somaiya's three-hour interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.