आयएनएस विराटला सोमवारी निरोप

By admin | Published: February 28, 2017 02:26 AM2017-02-28T02:26:25+5:302017-02-28T02:26:25+5:30

भारतीय नौदलाची शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट येत्या सोमवारी (६ मार्च) निवृत्त होत आहे.

INS Viraat to leave on Monday | आयएनएस विराटला सोमवारी निरोप

आयएनएस विराटला सोमवारी निरोप

Next


मुंबई : सागरी सेवेचा जागतिक विक्रम करणारी आणि तब्बल ३० वर्षे भारतीय नौदलाची शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट येत्या सोमवारी (६ मार्च) निवृत्त होत आहे. त्यासाठी नौदलाच्या मुंबई गोदीत एका विशेष सभारंभाचे आयोजन करण्यात येणार असून या अजस्त्र युद्धनौकेचे सारथ्य करणाऱ्या भारतीय आणि ब्रिटिश नौदलातील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख रिअर अडमिरल गिरीश लुथ्रा यांनी सांगितले. विराटच्या निवृत्तीच्या निमित्ताने आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. भारतीय नौदलप्रमुख सुनील लांबा हेही एकेकाळी विराटचे कमांडिंग आॅफिसर होते. तेही या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारताच्या नाविक सामर्थ्याचे प्रतीक बनलेली आयएनएस विराट १९८७ साली भारतीय नौदलात दाखल झाली होती. तत्पूर्वी २७ वर्षे ती ‘एचएमएस हरमीस’ या नावाने ब्रिटिश नौदलाच्या ताफ्यात कार्यरत होती. अशा प्रकारे ५७ वर्षांची सलग नौदल सेवा अन्य कोणत्याच युद्धनौकेने बजावलेली नाही, असे गिरीश लुथ्रा यांनी अभिमानाने नमूद केले. निवृत्तीपूर्वी आयएनएस विराटच्या दर्शनासाठी नौदलाने पत्रकारांना निमंत्रित केले होते. त्या वेळी लुथ्रा म्हणाले की, निवृत्तीनंतर या युद्धनौकेचे काय करायचे याचा निर्णय संरक्षण मंत्रालयात घेतला जाणार आहे. जुन्या निवृत्त युद्धनौकांचा विविध प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो. काही छोट्या युद्धनौका या किनाऱ्यावर योग्य ठिकाणी ठेवून त्या स्मारकरूपात ठेवल्या जातात. काहींचा उपयोग नौसैनिकांच्या प्रशिक्षणासाठी केला जातो, काही युद्धनौका या युद्ध व अस्त्र सरावासाठी लक्ष्याची भूमिकाही पार पाडतात, तर काही अखेरीस भंगारात काढल्या जातात. याआधीची विमानवाहू नौका विक्रांतची रवानगी अखेरीस भंगारातच करण्यात आली होती. मात्र, आयएनएस विराटचे रूपांतर संग्रहालयात करण्याची मागणी सध्या केंद्र सरकारच्या स्तरावर विचाराधीन असून अंतिम निर्णय तेथेच घेतला जाणार आहे.
‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ ज्याच्या हाती सागर, त्याचीच सत्ता, असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या विराटवर एकेकाळी १८ सी हॅरिअर विमाने व काही चेतक हेलिकॉप्टर्स होती. गेल्या वर्षी मेमध्ये झालेल्या समारंभात गोवा येथे या नौकेवरील विमाने व हेलिकॉप्टर काढून घेण्यात आली आणि त्यानंतर या नौकेला निवृत्त करण्याची प्रक्रियाही सुरू झाली. शिवाय, या युद्धनौकेवर एकाच वेळी ११०० नौसैनिक असत. युद्धकालीन आणि शांतताकालीन मोहिमांमध्ये विराटने अतुलनीय कामगिरी बजावली. १९८९ साली श्रीलंकेमध्ये भारतीय शांतीसेनेच्या आॅपरेशन ज्युपीटरमध्ये विराट सहभागी होती. शेकडो हेलिकॉप्टर फेऱ्या करून अनेकांना वाचवण्यात विराटने यश मिळवले. संसदेवरील अतिरेकी हल्ल्यानंतर २०११ मध्ये आॅपरेशन पराक्रमच्या माध्यमातून भारतीय संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली होती. त्या वेळी पश्चिम नौदल ताफ्याचे नेतृत्व करताना विराटने अनेक महिने पूर्ण तयारीत सज्ज राहून आपली भूमिका चोख बजावली होती. (प्रतिनिधी)
>पाणबुडींनी नौका बाहेर काढली
नवीन विमानवाहू नौका विक्रमादित्य आता पूर्ण क्षमतेने नोदलाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर विराट निवृत्त होत आहे. एकाच वेळी तीन विमानवाहू युद्धनौका असाव्यात असे नौदलाचे धोरण आहे. दुसऱ्या विमानवाहू नौकेचे बांधकाम कोचीनमध्ये सुरू असून त्या नौकेचे नाव विक्रांत ठेवण्यात येणार आहे. नौदलासाठी आधुनिक बहुद्देशीय हेलिकॉप्टर मिळवण्याचा कार्यक्रमही लवकरच पूर्णत्वास जायला हवा, अशी अपेक्षा रिअर अडमिरल गिरीश लुथ्रा यांनी व्यक्त केली.
तीन वर्षांपूर्वी स्फोटात २५०० टन वजनाची, किलो क्लास पाणबुडी सिंधुरक्षकदेखील आता निवृत्त करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी ती सेवेतून बाद करावी, असा नौदलाचा विचार आहे. मात्र अंतिम निर्णय दिल्लीतून येणे अपेक्षित आहे. या पाणबुडीवर आॅगस्ट २०१३ मध्ये झालेल्या स्फोटात १८ नौसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. बुडालेली ही पाणबुडीनंतर बाहेरही काढण्यात आली होती.
अलीकडेच दुरुस्तीदरम्यान आयएनएस बेतवा ही युद्धनौका पाण्यात कलंडली होती. ती आता सरळ उभी करण्यात आली आहे. बेतवाच्या अपघातापासून धडा घेऊन आम्ही सर्वच युद्धनौकांच्या तरतेपणाची परीक्षा करत आहोत. याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना सर्वच युद्धनौकांना देण्यात आल्या आहेत. बेतवाचा अपघात होता की मानवी चूक होती हे अद्यापी त्याबाबतच्या अहवालानंतर स्पष्ट होईल, असेही लुथ्रा यांनी सांगितले.

Web Title: INS Viraat to leave on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.