‘आधार’, सर्वेक्षणा’ची सांगड घाला - क्षत्रिय
By Admin | Published: July 29, 2016 01:41 AM2016-07-29T01:41:00+5:302016-07-29T01:41:00+5:30
सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास ‘आधार’ आणि केंद्र शासनाचे ‘सामाजिक आर्थिक सर्वेक्षण’ यांची सांगड घालणे आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन
नवी दिल्ली : सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास ‘आधार’ आणि केंद्र शासनाचे ‘सामाजिक आर्थिक सर्वेक्षण’ यांची सांगड घालणे आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी बुधवारी दिल्ली येथे निती आयोगाच्या राष्ट्रीय परिषदेत केले. त्यांच्या सूचनेचे परिषदेत अनेकांनी स्वागत केले.
केंद्र शासनाच्या आधार योजनेमुळे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर होण्यास मदत होत आहे. केंद्र शासन दरवर्षी सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करते. कोणतीही योजना राबविण्यासाठी परिपूर्ण माहितीची आवश्यकता असते, यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती व ‘आधार’ यामधील माहितीची सांगड घालणे आवश्यकता आहे. यामुळे शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात मदत होणार आहे, असेही क्षत्रिय यांनी सांगितले. विज्ञान भवन येथे निती आयोगाच्या वतीने सर्व राज्यांचे तसेच केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव तथा नियोजन सचिवांची राष्ट्रीय परीषदेत ते बोलत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)