आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:39 PM2024-11-25T15:39:52+5:302024-11-25T15:40:47+5:30
Bhaskar Jadhav: तिन्ही पक्षांना मिळूनही एवढा आकडा होत नाहीय की विरोधी पक्षनेते पद मिळेल. यावर आता जाधवांचे वक्तव्य आले आहे.
दीड वर्षांपूर्वी विधानसभेत बोलू दिले जात नाही, असे म्हणत हिवाळी अधिवेशनावेळी सभागृहात बोलू दिले जात नाही म्हणून आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, असे सांगत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर पाया पडत निघून गेलेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडे ठाकरे गटाचे गटनेतेपद आले आहे. मविआमध्ये ठाकरे गट सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. परंतू, या तिन्ही पक्षांना मिळूनही एवढा आकडा होत नाहीय की विरोधी पक्षनेते पद मिळेल. यावर आता जाधवांचे वक्तव्य आले आहे.
नवीन सरकार स्थापन झाले की आम्ही विरोधी पक्षनेते पदाची मागणी करणार असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. माझी गटनेते पदी निवड झाली हे अनपेक्षित आहे, स्वत: लाही माझी निवड व्हावी असे वाटत नव्हते. तुम्ही आणि संबंध महाराष्ट्र माझे अभिनंदन करत आहे असे समजून आभार मानतो, असे जाधव म्हणाले.
मी ग्रामीण भागात राहणारा माणूस आहे. मी मुंबईत राहणारा माणूस नाही. मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मंत्रालयात जाणे- येणे सोयीच ठरते. त्यामुळे ही निवड मुंबईमध्ये राहणाऱ्या एका जेष्ठ नेत्याची व्हावी म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावाचा मी आग्रह धरला होता. पण अध्यक्षांनी माझी निवड केली. तसा आदेश दिला त्यामुळे तो मी स्वीकारला असल्याचे जाधव म्हणाले.
शपथ विधी झाल्यानंतर आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की सरकारकडे विरोधीपक्षनेते पद मिळावे याची मागणी करणार असल्याचे जाधव म्हणाले.