संशयित बोटींची भर समुद्रात तपासणी
By admin | Published: December 6, 2015 01:59 AM2015-12-06T01:59:44+5:302015-12-06T01:59:44+5:30
मुरुडमधील समुद्रात २८ नोव्हेंबर रोजी कासा किल्ल्यापासून सुमारे मैलाच्या अंतरावर रायगड पोलिसांच्या सागर गस्त बोटीला दोन संशयास्पद बोटी निदर्शनात आल्या होत्या.
अलिबाग : मुरुडमधील समुद्रात २८ नोव्हेंबर रोजी कासा किल्ल्यापासून सुमारे मैलाच्या अंतरावर रायगड पोलिसांच्या सागर गस्त बोटीला दोन संशयास्पद बोटी निदर्शनात आल्या होत्या. त्यातील एक बोट जवान-८ ही सी गोइंग टग व जवान-८ ही प्रवासी बोट असल्याचे निष्पन्न झाले. या बोटी मलेशियामधील पेनाँग या ठिकाणाहून दुबई येथे जात होत्या. जवान-८ या टगच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पहाटे २ वाजण्याच्या दरम्यान बोटी नांगर करण्याकरिता कासा किल्ल्याजवळ आणल्याचे या परदेशी बोटींवरील खलाशांनी पोलिसांना सांगितले.
बोटीवर ९ इराणी, ३ भारतीय खलाशी
बोटीवर एकूण १२ खलाशी असून, त्यापैकी ९ खलाशी इराणी पासपोर्ट असलेले, तर ३ खलाशी भारतीय पासपोर्टधारक असल्याचे तपासणीत दिसून आले. बोटींची व खलाशांची कसून तपासणी केल्यावर या दोन्ही बोटींची रायगड बॉम्ब व स्फोटक तपासणी पथक व श्वान पथकाकडूनही तपासणी करण्यात आली. त्यात काहीही आक्षेपार्ह मिळून आले नाही.
डिझेल उपलब्ध झाल्यावर बोटी दुबईकडे रवाना
बोटीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर २९ नोव्हेंबर रोजी सकाळी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी या बोटचालकांना भारतीय हद्दीतून बाहेर जाण्यास सूचना दिली आहे. मात्र परदेशी बोटीचे डिझेल संपल्याने रेवदंडा बंदरात त्या दोन मैलांवर येऊन उभ्या होत्या. त्यांच्या कंपनीने मुंबईहून डिझेलसाठा पाठविलेला आहे.
शनिवारी या बोटींना डिझेल उपलब्ध झाल्यावर दोन्ही बोटींची पुन्हा सर्व प्रकारे तपासणी केल्यानंतर शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या दोन्ही बोटी दुबईकडे मार्गस्थ झाल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस मो. सुवेझ हक यांनी दिली आहे.