धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 05:56 IST2025-04-24T05:55:49+5:302025-04-24T05:56:20+5:30

माहिती ऑनलाइन मिळणार, काही रुग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.  

Inspection team now on watch over charitable hospitals; Chief Minister Devendra Fadnavis' instructions | धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवारी  येथे दिले.

धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन, गरीब रुग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रुग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रुग्ण निधींची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रुग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या आढावा बैठकीत घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकारी नेमावेत, असे फडणवीस म्हणाले. 

डॅशबोर्ड, फलक
धर्मादाय विश्वस्त नियमानुसार धर्मादाय रुग्णालयात १० टक्के खाटा निर्धन घटक तर १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. राज्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रुग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतच्या माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत. सर्व माहिती जाहीररित्या सर्वांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर टाकावी. शिवाय एका डॅशबोर्डवर माहिती दिल्यास रुग्णांना मदत होणार आहे, असे फडणवीस म्हणाले. 

सीएम फंडाची माहिती मोबाइलवर मिळणार 
राज्य शासनाच्या विविध सेवा व्हाॅट्सॲपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘मेटा’सोबत करार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश  फडणवीस यांनी दिले.

ऑनलाइन माहिती सक्तीची 
धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणाऱ्या रुग्णालयांनी रुग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रुग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन प्रणालित भरणे सक्तीचे करावे. महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या आणि महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करावी. याबाबत समन्वय करण्यासाठी क्लस्टर तयार करून समिती प्रमुख नेमून माहिती न भरणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही  फडणवीस यांनी दिले.

Web Title: Inspection team now on watch over charitable hospitals; Chief Minister Devendra Fadnavis' instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.