निरीक्षकाला अटक
By admin | Published: October 16, 2015 03:55 AM2015-10-16T03:55:07+5:302015-10-16T03:55:07+5:30
अनियमितताप्रकरणी कारवाई न करण्यासाठी वाईन शॉप मालकाकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय भरारी
औरंगाबाद : अनियमितताप्रकरणी कारवाई न करण्यासाठी वाईन शॉप मालकाकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय भरारी पथकाचा निरीक्षक सुभाष जाधव (रा. मुंबई) याला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून गुरुवारी रंगेहाथ पकडले.
पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘राज्यस्तरीय भरारी पथक बुधवारपासून औरंगाबादेत आहे. पथकाला कोणत्याही वाईन शॉपचे रेकॉर्ड तपासण्याचे आणि अनियमिततेबद्दल कारवाईचे अधिकार आहेत. जाधव या पथकाचा प्रमुख आहे.’
या पथकाने शहरातील काही वॉईन शॉप तपासले. त्यानंतर त्यांनी गारखेड्यातील सूतगिरणी चौकात असलेल्या एका वाईन शॉपचे मालक हितेश मकवाणी यांना बोलावून घेतले. हितेश यांच्या मालकीची आणखी दोन वाईन शॉप आहेत. नोकरांची माहिती प्रशासनास दिली नाही, मद्याचा साठा, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले नसल्याचे दाखवून, जाधवने दुकानावर कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १ लाख २० हजार रुपये ठरले. हितेश यांनी या संदर्भात एसीबीकडे तक्रार दाखल केली. दुपारी एकच्या सुमारास तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना जाधव याला रंगेहात पकडले.