एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Published: June 9, 2017 03:24 AM2017-06-09T03:24:28+5:302017-06-09T03:24:28+5:30
पाणीपुरवठा केला जात नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील प्रभागांमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जात नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर धडक दिली. यावेळी नगरसेवकांनी कार्यकारी अभियंत्यास घेराव घातला.
उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्यास नगरसेविका प्रेमा म्हात्रे, आशालता बाबर, सुनीता पाटील, दमयंती वझे, जालिंदर पाटील, विनोद काळण, रविना माळी, शैलजा भोईर, मुकेश पाटील, प्रकाश म्हात्रे आदी नगरसेवकांनी एमआयडीसीच्या कार्यालयास धडक दिली. पाणी कमी दाबाने येत असल्याचा जाब विचारत त्यांनी कार्यकारी अभियंते एस. एस. ननावरे यांना घेराव घातला.
उपमहापौर भोईर यांनी सांगितले की, २७ गावांना एमआयडीसीकडून यापूर्वी दररोज ३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता. हा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने २७ गावांचा पाण्याचा कोटा वाढवण्यात आला. वाढीव कोट्यानुसार २७ गावांना जवळपास ५५ दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरवले जाते. तरीही २७ गावांतील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी कोणत्या गावात किती दाबाने व किती पुरविले जाते, याच्या नोंदी घेतल्या जात नाहीत. पिसवली येथे वॉल बसवला आहे. मात्र, तेथे दीड किलोच्या दाबाने पाणी पुरवठा केला जातो. काही भागात अर्धा किलो दाबाने पाणी पुरवठा केला जातो. काही भागात पुरेशा दाबाने पाणी मिळते. काही भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा केला जात नाही. ही असमान पाणी वाटपाची स्थिती का आली आहे, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
पाणीपुरवठ्याच्या बिलापोटी गतवर्षी महापालिकेने पाच कोटी रुपये एमआयडीसीकडे भरले आहेत. तसेच पाणी पुरवठ्यासाठी भरावी लागणारी दोन कोटी ४२ लाख रुपये ही अनामत रक्कमही महापालिकेने यंदाच्या वर्षी एमआयडीसीला भरली आहे. याशिवाय दरमहा पाणी पुरवठ्याचे ८० लाख रुपयांचे बिल भरण्याची हमी दिली आहे. पालिकेकडून बिलाचा प्रश्न निकाली निघाला आहे. बिल भरूनही गावांना पाणी मिळत नाही. पाण्याचा कोटाही वाढवला आहे. नेमका कुठे दोष आहे. त्याचा शोध घेण्यासाठी शनिवारी २७ गावांतील नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी व एमआयडीसी पाहणी करून नक्की काय दोष आहे, याचा शोध घेणार आहेत. पाणीपुरवठा कमी दाबाने का होतो, हे तपासले जाणार आहे. टाटा नाका व कोळेगाव येथे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. ही ठिकाणी शनिवारी पाहिली जाणार आहेत.
>उद्या पाहणी करून दोष शोधणार
२७ गावे आणि एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठ्यातील दोष शनिवारी पाहणी करून शोधला जाणार आहे. नगरसेवकांनी गुरुवारी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याला घेराव घातला. तेव्हा महापालिकेचे अधिकारी त्याठिकाणी चर्चेसाठी आलेले नसल्याने याविषयी उपमहापौर भोईर यांनी नाराजी व्यक्त केली, असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ननावरे यांनी सांगितले.