साहित्यिकांच्या सन्मानाने प्रेरणा मिळते
By Admin | Published: November 25, 2015 03:57 AM2015-11-25T03:57:49+5:302015-11-25T03:57:49+5:30
विदर्भ कला आणि संस्कृतीच्या संदर्भात समृद्ध असा प्रदेश आहे, पण कस्तुरीमृग कस्तुरीच्या शोधात धावतो, तशीच विदर्भाची स्थिती आहे.
यवतमाळ : विदर्भ कला आणि संस्कृतीच्या संदर्भात समृद्ध असा प्रदेश आहे, पण कस्तुरीमृग कस्तुरीच्या शोधात धावतो, तशीच विदर्भाची स्थिती आहे. ख्यातनाम कथाकार शरश्चंद्र टोंगो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रीय कथा स्पर्धेचे आयोजन करून विजेत्यांचा ‘लोकमत’ने सन्मान केला. चांगल्या लोकांच्या, साहित्यिकांच्या सन्मानाने इतरांनाही चांगल्या कार्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच ही स्पर्धा आणि हा समारंभ महत्त्वाचा आहे, असे मत राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
चेन्नईचे (तामिळनाडू) आशुतोष गोपाळराव जोशी यांना प्रथम, राजापूरच्या (रत्नागिरी) वृषाली आठल्ये यांना द्वितीय, तर परतवाडा येथील (अमरावती) प्रा. एकनाथ तट्टे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिंचवडच्या (पुणे) प्राजक्ता अ. शहा आणि भंडाऱ्याचे प्रमोदकुमार अणेराव यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, तर प्रमुख अतिथी म्हणून ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा, महसूल राज्यमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)