Eknath Shinde Cabinet Expansion: दोन खासदार, सात आमदार असूनही भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला 'भोपळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:39 PM2022-08-09T13:39:16+5:302022-08-09T13:39:40+5:30
Cabinet Expansion Solapur: भाजपच्या मागील मंत्रिमंडळात आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे सहकार खाते होते. आमदार विजयकुमार देशमुख आरोग्य राज्यमंत्री होते.
सोलापूर : जिल्ह्यात भाजपचे सात आमदार आणि दोन खासदार आहेत. तरीही मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या हाती 'भोपळा' आला.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपकडून विधानपरिषदेचे आमदार आहेत.
भाजपच्या मागील मंत्रिमंडळात आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे सहकार खाते होते. आमदार विजयकुमार देशमुख आरोग्य राज्यमंत्री होते. आमदार सुभाष देशमुख दुसऱ्यांदा निवडून आले तर विजयकुमार देशमुख यांची ही चौथी टर्म आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता राखण्यात दोन देशमुखांनी महत्त्वाची भूमिका निभावली. सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून आणण्यातही दोघांचा महत्त्वाचा वाटा राहिला. त्यामुळे या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी भाजप कार्यकर्त्यांना आशा होती.
भाजपकडून मंत्रीपदासाठी विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचेही नाव चर्चेत होते. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आणण्यात आणि जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष करण्यात रणजीतसिंह यांची महत्त्वाची भूमिका होती. भाजप नेत्यांनी दोन देशमुख आणि मोहिते पाटील यांचाही विचार केला नाही.
सावंत मूळचे सोलापूर जिल्ह्याचे पण मंत्रीपद उस्मानाबादच्या कोट्यातून मंत्रीपदाची शपथ घेणारे डॉ. तानाजी सावंत हे मूळचे वाकाव (ता.माढा) येथील आहेत. पण ते परंडा (जि. उस्मानाबाद) मतदारसंघातून निवडून आले आहेत.