शेतकऱ्यांना तत्काळ १० हजारांची मदत
By admin | Published: June 14, 2017 04:17 AM2017-06-14T04:17:26+5:302017-06-14T06:34:38+5:30
कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीसाठी तातडीने १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.
- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीसाठी तातडीने १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केली आणि ती लगेच मंजूर केली गेली.
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अशी रोख मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती लगेच स्वीकारली. या निर्णयाबद्दल रावते यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राज्य सरकारने याआधीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरसकट कर्जमाफीचा तपशीलवार प्रस्ताव सादर करणे, निकष ठरवणे यासाठी काही काळ जाणार आहे. खरिपाच्या पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बी-बियाणे खरेदीसाठी तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही रक्कम नवे पीककर्ज देताना कापून घेण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर या रकमेचा बोजा पडणार नाही, असे रावते यांनी पत्रकारांना सांगितले.
दौंडच्या आमदाराने कर्जमाफी नाकारली...
आमदार, खासदारांनी कर्जमाफी घेऊ नये, या राज्य सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ‘मला कर्जमाफीतून वगळा’ असे विनंती पत्र आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.
राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या माफीचा लाभ धनदांडगे व उत्पन्नाचे इतर स्रोत असलेली मंडळी घेतील, अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशा सधन मंडळींनी स्वत:हून कर्जमाफी नाकारावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार आ. कुल यांनी कर्जमाफी नाकारली आहे.
आपल्यावर
२० लाख रुपयांचे कृषी कर्ज असून, ते फेडण्यास मी व माझे कुटुंबीय सक्षम आहोत,
असे कुल
यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.