बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून ७२ तासांत ३५ रुग्णांवर तातडीने उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 08:07 PM2017-08-04T20:07:39+5:302017-08-04T20:07:47+5:30
मुंबईमध्ये बाईक अॅम्ब्युलन्सची उपयुक्तता सिद्ध होत असून या सेवेचा शुभारंभ झाल्याच्या अवघ्या ७२ तासांत ३५ रूग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. विशेषत: शहर-उपनगरातील दाटीवाटीचा परिसर, रेल्वे स्थानकांवरील अनेक आपत्कालीन प्रसंगांमध्ये ही सेवा अतिशय उपयुक्त ठरत आहे.
स्नेहा मोरे
मुंबई, दि. 4 - मुंबईमध्ये बाईक अॅम्ब्युलन्सची उपयुक्तता सिद्ध होत असून या सेवेचा शुभारंभ झाल्याच्या अवघ्या ७२ तासांत ३५ रूग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. विशेषत: शहर-उपनगरातील दाटीवाटीचा परिसर, रेल्वे स्थानकांवरील अनेक आपत्कालीन प्रसंगांमध्ये ही सेवा अतिशय उपयुक्त ठरत आहे. आतापर्यंत या सेवेच्या माध्यमातून तातडीच प्रथमोपचार करण्यात आलेली प्रकरणे ही रेल्वे स्थानक व परिसरातील आहेत.
२ आॅगस्ट रोजी बुधवारी शुभारंभ झाल्यानंतर त्या रात्री लगेच दोन रुग्णांना बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपत्कालीन सेवा पुरविण्यात आली आहे. त्यानंतर गुरुवारी १२ आणि शुक्रवारी २१ अशा एकूण ३५ रुग्णांवर प्रथमोपचार करण्यात आले. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांना योग्य वेळी पुढील उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याने अनेकांचे प्राण वाचविण्यात आले.
काल गुरूवारी शहरातील वेगवेगळ्या भागातील घटनांमध्ये १२ रुग्णांना या सेवेचा लाभ झाला. ठाकूर व्हिलेज परिसरातील अपघाताच्या प्रकरणातील २५ वर्षीय तरुणावर तसेच धारावी पोलीस स्थानक परिसरातील जळीत रुग्णावर तत्काळ प्रथमोपचार करण्यात आले. भांडूप परिसरातील तरुणाला रस्त्यावरच चक्कर आल्याने त्यावर उपचारासाठी १०८ क्रमांकावर फोन करण्यात आला. भांडूप परिसरातील दुचाकीस्वार डॉक्टरांनी गर्दीची आडकाठी येऊ न देता त्याच्यावर उपचार केले. मुंबईच्या प्रचंड रहदारी असणाºया शहरात ज्या भागात जिथे अरुंद रस्त्यांमुळे मोठी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही अशा परिसरात ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सुरुवातीच्या ७२ तासांतील विविध प्रकरणांवरून दिसून येत आहे.
...............
(कोट)
१०८ वर प्राप्त झालेल्या अनेक कॉल्समध्ये पादचारींकडून रुग्णांची माहिती कळविण्यात आली आहे. बोरीवली,वांद्रे रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर, मुंबई विमानतळ येथून देखील यासेवेसाठी कॉल करण्यात आले आहे. सायन कुर्ला पुल, चिता कॅम्प, मालाड, सांताक्रुज, गोरेगाव चित्रनगरी, कलिना कॅम्पस, भांडुप, नागपाडा, कुरार, चारकोप, जोगेशेवरी आदी भागातील रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले. विविध आपत्कालीन परिस्थितीतील तसेच अचानक उद्भवलेल्या प्रकृती अवस्थतेच्या प्रकरणांतील रुग्णांवर तातडीने केलेल्या उपचारांमुळे अनेकांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
बाईक अॅम्ब्युलन्स कार्यान्वित करण्यात आलेली मुंबईतील ठिकाणे
- अशोक टेकडी, जमिल नगर, भांडुप (प)
- चिता कॅम्प प्रसूती गृह, मानखुर्द
- धारावी पोलीस ठाणे
- नागपाडा पोलीस ठाणे
- कुरार पोलीस ठाणे, अप्पा पाडा, मालाड (पू)
- चारकोप पोलीस ठाणे
- गोरेगाव चित्रनगरी
- खारदांडा पोलीस ठाणे
- अप्पर आयुक्त पोलीस ठाणे, ठाकूर व्हिलेज
- मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस