अग्निऐवजी झाडाच्या साक्षीने ‘सप्तपदी’
By admin | Published: June 27, 2017 01:46 AM2017-06-27T01:46:04+5:302017-06-27T03:54:05+5:30
विवाह बंधनात सप्तपदीला विशेष महत्त्व दिले जाते. वर्धेतील एका नवदाम्पत्याने हा विधी अग्निऐवजी झाडाला साक्षी मानून केला
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विवाह बंधनात सप्तपदीला विशेष महत्त्व दिले जाते. वर्धेतील एका नवदाम्पत्याने हा विधी अग्निऐवजी झाडाला साक्षी मानून केला. वृक्षतोड करून हवन करण्याऐवजी या दाम्पत्याने एका रोपट्याची पूजा केली. तसेच सप्तपदीनंतर वर्धेतील हनुमान टेकडीवर रोपटे लावून निसर्गसंवर्धनाचा संदेश देत संसाराला सुरुवात केली.
वर्धा येथील भास्कर कोहळे यांची कन्या निकिता आणि पनवेल येथील दिनकर इंगोले यांचे चिरंजीव भूषण या दोघांचा रविवारी वर्ध्यात विवाह झाला. भूषण यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून ते मुंबई येथे फिल्म एडीटिंगचे काम करतात, तर वधू निकिता ही येथील सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दोघेही उच्चशिक्षित असल्याने त्यांनी विवाह समारंभात होत असलेल्या कर्मकांडांना फाटा देण्याचा निर्णय घेत सप्तपदीऐवजी वृक्षपदी करण्याचा निर्णय घेतला.
हनुमान टेकडीवर वृक्षारोपण
विवाह मंडपात इतर सोपस्कार पार पाडल्यानंतर कुटुंबीयांच्या वतीने सप्तपदीचा विधी सुरू झाला. या वेळी होम पेटविण्याऐवजी त्यांनी एका रोपट्याला सात प्रदक्षिणा घालून विधी आटोपला. त्यानंतर, परिवारासह हनुमान टेकडी गाठून येथे वैद्यकीय जनजागृती मंचच्या वतीने वृक्षारोपणासाठी तयार केलेल्या खड्ड्यात रोपटे लावण्यात आले.