आशीर्वाद देणाऱ्यांऐवजी आता गळा दाबणारे हात - उद्धव ठाकरे
By admin | Published: February 10, 2017 05:18 AM2017-02-10T05:18:15+5:302017-02-10T05:18:15+5:30
भारतीय जनता पार्टीच्या मंचावर आडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज दिसायच्या. मात्र आता आशीर्वाद देणाऱ्यांऐवजी आता गळा दाबणारेच हात असल्याची जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली
मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या मंचावर आडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज दिसायच्या. मात्र आता आशीर्वाद देणाऱ्यांऐवजी आता गळा दाबणारेच हात असल्याची जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरे यांचा भाजपावर हल्लाबोल सुरुच असून, अंधेरी येथे गुरुवारी रात्री झालेल्या सभेत उद्धव यांनी भाजपाला पुन्हा टीकेचे लक्ष्य केले. परिणामी उद्धव यांच्या प्रत्येक जाहीर सभेला प्रत्युत्तर देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता यावर काय बोलतात? याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे.
गिरगाव, भांडुप, मुलुंड, चांदिवली येथील सभा गाजवत उद्धव यांच्या तोफांचा मारा सुरुच आहे. भाजपाच्याही सभांतून सेनेला प्रत्युत्तर दिले जाते आहे. परिणामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपामध्ये रंगलेली जुगलबंदी आणखीच वाढत आहे. अंधेरी येथील सभेत विशाल समुदायाला उद्देशून उद्धव म्हणाले, भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी कोणाशीही हातमिळवणी करते. भाजपवर टीका करताना मुंबईकरांना मान खाली घालायला लावेल, असे एकही काम शिवसेनेने केलेले नाही. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात महापालिकेतील कामांचा उल्लेख केला आहे, बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख मुद्दाम केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘चिक्की किती आणि कोण खातंय हे लोकांना कळू द्या...’ असे म्हणत अप्रत्यक्षरित्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.
भाजपवर टीका करतानाच उद्धव यांनी युती तोडली नसती तर पप्पू कलानीसोबत माझा फोटो झळकला असता, असेही वक्तव्य करत गुंडांना पक्ष प्रवेश देणाऱ्या भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांविरोधात शिवसेना सदैव उभी असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या अंधेरीतील भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी रत्नागिरी येथे अपघातात मृत्यू झालेल्या सात शिवसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.