फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 12:20 PM2024-04-03T12:20:38+5:302024-04-03T12:25:22+5:30
Lok Sabha Election 2024 : भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आता आपण फक्त विकासावरच बोलणार असल्याचे सांगत प्रणिती शिंदे यांनीही फक्त विकासावरच बोलावं, अशा शब्दांत फटकारले.
सोलापूर : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीसाठी धामधूम सुरु आहे. उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून ठिकठिकाणी आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. दरम्यान, सोलापूर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपूर्वी माझे चारित्र्यहनन करणारे फोटो, पोस्ट दाखवल्या जातील, माझी बदनामी केली जाईल, असा संशय व्यक्त करत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. यावर आता प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
आम्ही संस्कारी असून आमच्यावर असले संस्कार नाहीत, असे सांगत त्या आमच्या भगिनी आहेत, त्यांनी फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, मी फक्त विकासावरच बोलत असल्याचे राम सातपुते यांनी सांगितले. दरम्यान, सोलापूर लोकसभेला आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपानं निवडणूक गाजायला लागली होती.
भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आता आपण फक्त विकासावरच बोलणार असल्याचे सांगत प्रणिती शिंदे यांनीही फक्त विकासावरच बोलावं, अशा शब्दांत फटकारले. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरला जितकं दिलं, तेवढं काँग्रेसनं दिलं का? असा सवाल करत सोलापुरात केलेल्या कामांचा पाढा राम सातपुते यांनी वाचला. प्रणिती शिंदे यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्याने वाटेल तशी वक्तव्य करत असून पुलवामा हल्ल्यावरील आरोप हा तर तमाम शहिदांचा अवमान असल्याचे राम सातपुते यांनी सांगितले.
दरम्यान, पंढरपूर तालुका आणि शहरात राम सातपुते यांनी गाठीभेटीचा कार्यक्रम सुरू केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा पंढरपुरात राम सातपुते यांनी शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस वंदन केले. यावेळी झालेल्या बैठकीत प्रणव परिचारक, नीलराज डोंबे, लेखन चौघुले यांचेसह परिचारक गटाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.