‘पीएफ’ऐवजी आता ‘यूएएन’
By Admin | Published: June 12, 2015 12:28 AM2015-06-12T00:28:54+5:302015-06-12T00:35:24+5:30
खातेदारांचा प्रतिसाद : कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयात नोंदणी सुरू
संदीप खवळे - कोल्हापूर -कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या युनिव्हर्सल अकाउंट नंबरच्या कार्यान्वयन (यूएएन) मोहिमेस कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयामधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
जुन्या पीएफ क्रमांकाची जागा ही यूएएन घेत आहे. कितीही नोकऱ्या बदलल्या तरी हा क्रमांक एकच राहणार असल्यामुळे ‘पीएफ’चे काम आता सोपे झाले आहे. कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयात ६,८०,४८६ भविष्यनिर्वाह निधी खाती आहेत. यांपैकी २,७७,९३७ खातेदारांना यूएएन क्रमांक जुलै २०१४ पर्यंत देण्यात आले होते. यापैकी ३२९९८ खातेदारांची यूएएन खाती आतापर्यंत कार्यान्वित करण्यात आली आहेत, अशी माहिती कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संगठनच्या कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयाने दिली आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संगठन कार्यालयातर्फे तीन प्रमुख योजना चालविल्या जातात. यामध्ये कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर भविष्यनिर्वाह निधीतील हिस्सा आणि त्यावरील व्याजाचा लाभ मिळतो. भविष्यनिर्वाह निधीमध्ये १२ टक्के हिस्सा हा कर्मचाऱ्यांचा, तर १२ टक्के हिस्सा हा मालकाचा असतो. यापैकी मालकाच्या १२ टक्के हिश्श्यापैकी ८.३३ टक्के पेन्शन निधीसाठी, तर उर्वरित ३.६७ टक्के हिस्सा कर्मचाऱ्याच्या भविष्यनिर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्यात येतो. यापूर्वी नोकरी बदलली की कर्मचाऱ्यांना संबंधित मालकाकडे नवीन पीएफ खाते तयार करावे लागत असे. ही प्रक्रिया वेळखाऊ असायची; पण आता युनिव्हर्सल अकाउंट नंबरमुळे पूर्वीप्रमाणे सतत पीएफ क्रमांक बदलावा लागणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्याने कितीही नोकऱ्या बदलल्या तरी त्याचा यूएएन क्रमांक तोच राहणार आहे. पीएफ खातेदारांना यूएएन क्रमांक देण्यासाठी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध औद्योगिक, वाणिज्य हबमध्ये २४ कॅम्प आयोजित केले होते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने केले आहे.
युनिव्हर्सल अकाऊंट नंबरचे फायदे
कर्मचाऱ्याने संपूर्ण हयातीमध्ये देशभरात कुठेही नोकरी केली तरी त्याचा भविष्यनिर्वाह निधी क्रमांक एकच राहणार.
यूएएन क्रमांक मोबाईलला लिंक केल्यास, पीएफची रकमेची माहिती ‘एसएमएस’वर मिळणार.
यूएएन पोर्टलवरून यूएएन कार्ड, पीएफ पासबुक, तसेच केवायसी तपशील (बँक खाते क्रमांक, पॅन, आधार कार्ड), आदींची माहिती.
फॉर्म अकरा भरून यूएएनची माहिती नवीन मालकाला देणे सहजशक्य.