नदीपात्राऐवजी संभाजी पुतळ्यापासून सुरुवात

By admin | Published: September 24, 2016 01:31 AM2016-09-24T01:31:14+5:302016-09-24T01:31:14+5:30

राज्यातील विविध जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने काढला जाणारा मूक मोर्चा येत्या रविवारी पुण्यातही आयोजित करण्यात आला

Instead of river basin, start from the Sambhaji statue | नदीपात्राऐवजी संभाजी पुतळ्यापासून सुरुवात

नदीपात्राऐवजी संभाजी पुतळ्यापासून सुरुवात

Next


पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने काढला जाणारा मूक मोर्चा येत्या रविवारी पुण्यातही आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा योग्य पद्धतीने पार पडावा व सहभागींना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी २२ समित्यांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मूक मोर्चा संयोजन समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कोपर्डी येथील घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई करावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रासिटी कायद्यात दुरुस्ती करावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा राज्याच्या विविध भागात काढण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये निघणाऱ्या मूक मोर्चांना मिळणारा लाखोंचा प्रतिसाद पाहता, पुण्यातील मूक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह इतरही ठिकाणहून लाखोंच्या संख्येत मराठा बांधव येण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात येत आहे.
मोर्चादरम्यान स्थानिकांना आणि सहभागींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, प्रसिद्धी व प्रचार, अल्पोपाहार समिती, मार्गदर्शक समिती, स्वयंसेवक समिती, संरक्षण समिती अशा विविध २२ समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
हा मोर्चा २५ सप्टेंबरला सकाळी १०.३०ला गुडलक चौकातून निघणार असून, डेक्कन जिमखाना येथील गरवारे पुलाजवळील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर खंडुजीबाबा चौकापासून मूक मोर्चास प्रारंभ होणार आहे. खंडुजीबाबा चौक, अलका टॉकीज चौकातून लक्ष्मी रस्त्याने मूक मोर्चा सरळ निघणार आहे. बेलबाग चौक, सोन्या मारूती चौक, सतरंजीवाला चौक, नाना पेठ, क्वार्टर गेट मार्गे एम.एस.ई.बी चौक, समर्थ पोलीस ठाणे मार्गे लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद कार्यालयमार्गे कौन्सिल हॉल येथे मूक मोर्चा जाणार आहे. कौन्सिल हॉल येथे मोर्चाची सांगता झाल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. मोर्चादरम्यान २० रुग्णवाहिका, २ कार्डियाक रुग्णवाहिका, ५५० डॉक्टर, २०० नर्स, ५०० पॅरामेडिकल स्टाफ, २०० मदतनीस अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या रुग्णवाहिका मोर्चाच्या मार्गावर एक चौक सोडून एक अशा प्रकारे ठेवण्यात येणार आहे.
>मोर्चा पुढे जाताच मागे स्वच्छता
मराठा क्रांती (मूक) मोर्चात लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहे. मोर्चामुुळे कोठेही अस्वच्छता पसरू नये यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम मोर्चा जस जसा पुढे जाईल, त्याप्रमाणे मागील रस्ता स्वच्छ करण्यात येणार आहे. मोर्चा मूक असल्यामुळे कोणत्याही प्रकारची घोषणा या वेळी देण्यात येणार नाही.
>विद्यार्थ्यांनी लवकर परीक्षा केंद्रावर जावे
रविवारी एमपीएससीसह विविध बँका आणि अन्य विभागांच्या परीक्षा आहेत. या परीक्षा साधारण अकराला सुरू होतात. त्यामुळे विद्यार्थी १० वाजता घरातून निघतात. मात्र, मोर्चा असल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी वेळेआधीच म्हणजे शक्यतो सकाळी नऊच्या आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे.
>स्पीकर व वॉकीटॉकीचा वापर होणार
मोर्चाचा सुरूवात व सांगता ज्या ठिकाणी होणार आहे, त्या डेक्कन आणि विधान भवन चौकात स्पीकर व व्यासपीठाची व्यवस्था करण्यात येणार आहे. निवेदनाचे वाचन बीजे मेडिकल मैदानापर्यंत ऐकू येईल, अशी स्पीकर व्यवस्था करण्यात येणार आहे. मोर्चामध्ये २० ते २२ रिक्षामध्ये स्पीकरची व्यवस्था केली जाणार आहे. पोलिसांच्या वॉकीटॉकीद्वारे सूचना दिल्या जाणार आहेत.

Web Title: Instead of river basin, start from the Sambhaji statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.