संस्थानकालीन पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2016 01:22 AM2016-08-26T01:22:57+5:302016-08-26T01:22:57+5:30
भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत.
भोर : भोर तालुक्यातील आंबेघर (ता. भोर) येथील नीरा नदीवरील संस्थानकालीन सुमारे ८१ वर्षांपूर्वीच्या दगडी पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. दगडांना भेगा पडल्या आहेत. त्यात झाडे उगवली असून, पुलावरून गाडी गेल्यावर पूल हलतो. या पुलावरून चारचाकी गाडी पडून झालेल्या अपघातात चौघांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे.
महाड-पंढरपूर रस्त्यावरील आंबेघर येथील नीरा नदीवर संस्थानकाळात हा दगडी पूल १९३५ मध्ये बांधण्यात आला आहे. त्यावर राज्यमार्ग असून, कोकणात जाणारा हा एकमेव मार्ग आहे.
नीरा-देवघर धरण भागातील रिंगरोड व महाड रोडवरील दोन्ही बाजूंकडील लोक याच मार्गाचा वापर करीत असल्याने वाहनांची सतत गर्दी असते. पुलाच्या बांधकामानंतर ८० वर्षांत कोणत्याच प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही.
त्यामुळे पुलाचे सरंक्षक कठडे तुटलेले असून, दगडी पिलर खराब झाले आहेत. पुलावरून वाहने गेल्यावर पूल थरथरतो. कठडे खराब असल्याने गेल्या वर्षी पहाटे चारचाकी गाडी पुलाववरून नदीपात्रातील पाण्यात पडली. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या संरक्षक कठड्यांना रंगरंगोटी केली; मात्र चारचाकी ज्या ठिकाणावरून पडली तेथे संरक्षक कठडे न बसवता इतर ठिकाणी कठडे बसविले. त्यामुळे पुन्हा एखादा अपघात होऊ शकतो.
( वार्ताहर)