‘जॉली एलएलबी २’मधील दृश्ये कापण्याचे निर्देश
By Admin | Published: February 7, 2017 05:39 AM2017-02-07T05:39:31+5:302017-02-07T05:39:31+5:30
‘जॉली एलएलबी २’ चित्रपटातील ‘तीन आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद’ न्यायव्यवस्थेची अप्रतिष्ठा करणारे
औरंगाबाद : ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटातील ‘तीन आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद’ न्यायव्यवस्थेची अप्रतिष्ठा करणारे असल्याचा अमायकस क्युरींचा अहवाल स्वीकारत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ते वगळण्याचे आदेश सोमवारी सेन्सॉर बोर्डाला दिले. न्यायालयाने निर्मात्यांचे लेखी निवेदनही स्वीकारले.
चित्रपटात लखनऊ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत आणि नामफलक दाखविला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वकील आणि पोलीस अधिकारी न्यायालयात पत्ते खेळतात. न्यायमूर्तींच्या आसनासमोर धावून जातात, मारामारी आणि बीभत्स नृत्यही करतात, असे दाखविले होते.
चित्रपट ‘सत्य घटनेवर आधारित’ आहे, असे सांगून निर्माता व दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी न्यायव्यवस्थेची बेअब्रू आणि वकिली व्यवसायाची चेष्टा केल्याचे याचिकेत म्हटले होते. चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या मनात न्यायालयाबद्दल आदर राहणार नाही, असे आक्षेप याचिकाकर्त्यांनी नोंदविले. प्रतिवादींतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ पी. एम. शहा यांनी केवळ ट्रेलरवरून याचिकेची दखल घेऊ नये, असे म्हटले होते. त्यानंतर चित्रपट पाहून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी खंडपीठाने ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, व्ही. जे. दीक्षित व डॉ. प्रकाश कानडे यांची अमायकस क्युरी म्हणून समिती नेमली होती.