विद्यापीठ परीक्षांबाबत पर्याय पडताळण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 05:35 AM2020-05-31T05:35:30+5:302020-05-31T05:35:51+5:30

मुख्यमंत्र्यांकडून आढावा । नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन होणार

Instructions to explore options for university exams | विद्यापीठ परीक्षांबाबत पर्याय पडताळण्याचे निर्देश

विद्यापीठ परीक्षांबाबत पर्याय पडताळण्याचे निर्देश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्यापरीक्षा घ्या. त्यासाठी नेमकी परीक्षापद्धती आणि वेळापत्रक निश्चित करण्यासाठी विविध पर्याय पडताळून पाहवेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले.
विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक झाली. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आदी सहभागी झाले.
अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या संकटाला संधी मानून महाराष्ट्रातील प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यातील प्रादेशिक विषमता संपविण्यासाठी प्रयत्न करण्याचे, नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, जुलैमध्ये परीक्षा शक्य नाही, हे स्पष्ट होऊ लागले आहे. केरळ आणि गोवा राज्यातील परिस्थितीही आटोक्यात आली असे म्हणता म्हणता बदलली आहे. आपल्याकडे मुंबई, पुणे आणि औरंगाबादची परस्थितीही सतत बदलत आहे. त्यामुळे या संकटाचे संधीत रुपांतर करता येईल का? त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याचा विचार करायला हवा.
मंत्री उदय सामंत, यांनी परीक्षा वेळेत घेण्यासाठी सुरू असलेल्या नियोजनाची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही विचार करुन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली जाईल.
कोविड-१९च्या अनुषंगाने विद्यापीठीय परीक्षांबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनीही काही सूचना मांडल्या.

Web Title: Instructions to explore options for university exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.