डीएसकेंच्या मुलाला शरण येण्याचे निर्देश; अटकपूर्व जामीन देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:29 AM2018-06-06T01:29:58+5:302018-06-06T01:29:58+5:30
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.
मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. उच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांना अर्ज मागे घेण्याची सूचना करत शरण येण्यास सांगितले आहे.
आपल्या परिवारातील अनेकांच्या नावावर डीएसकेंनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात मुलगा शिरीष कुलकर्णी व सून तन्वी कुलकर्णी यांचाही समावेश आहे. अटकेपासून बचाव व्हावा, यासाठी शिरीष कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती.
शिरीष कुलकर्णी स्वत:ला डीएसकेंच्या ब्रँडपासून वेगळे ठेवू शकत नाहीत, असे म्हणत उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करणार नसल्याचे स्पष्ट केले. जामीन अर्ज फेटाळण्याऐवजी त्यांनी तो मागे घ्यावा आणि शरण यावे. शरण केव्हा जाणार याची माहिती ८ जूनपर्यंत द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. ठेवीदारांची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या पत्नीवर काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.