स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:25 PM2024-01-02T19:25:08+5:302024-01-02T22:48:34+5:30

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

instructions to administration from chhagan Bhujbal regarding supply of cooking gas petrol diesel | स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना 

स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना 

Chhagan Bhujbal On Truck Drivers Protest ( Marathi News ) : केंद्र सरकारने अपघातांबद्दल आणलेल्या नवीन कायद्याला विरोध करत देशातील विविध ठिकाणी वाहनचालकांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही बघायला मिळाले असून अनेक जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील वाहतूकदारांच्या संपामध्ये पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सरकारला सर्वसामान्यांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला याबाबतचे आदेश दिले आहेत.

"स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी.चा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी," अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना केल्या आहेत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार एल.पी.जी., पेट्रोल व डिझेलचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये होतो. सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक व पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, वाहनचालकांच्या संपाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही घेण्यात आली आहे. "तेल कंपन्यांच्या रिफायनरीमध्ये एलपीजीची वाहतूक करणारे वाहनचालक व वाहतुकदार यांच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेचे कुठल्याही प्रकाराची बाधा येऊ नये," अशा सूचना एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला दिल्या आहेत.  


 

Read in English

Web Title: instructions to administration from chhagan Bhujbal regarding supply of cooking gas petrol diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.