साधनशुचितेच्या गप्पा...

By admin | Published: August 6, 2015 10:49 PM2015-08-06T22:49:53+5:302015-08-06T22:49:53+5:30

कारण राजकारण

Instrument chat ... | साधनशुचितेच्या गप्पा...

साधनशुचितेच्या गप्पा...

Next

स्थळ : सांगलीतलं भाजपचं कार्यालय... आता कुठल्या भाजपचं, असं विचारू नका! जितके नेते तितक्या पार्ट्या, गट, उपगट हे काँग्रेसवाल्यांचं प्रमुख लक्षण आता भाजपमध्येही दिसायला लागलंय ना, त्यामुळं असा सवाल आपसूकच येतो. मूळ भाजपेयींचा गट, ‘जेजेपी’ तथा जयंत पाटील पार्टी, त्यातली संजयकाका आणि जगतापसाहेब यांची उपपार्टी, गाडगीळ सराफांचा गट, मंत्र्या-संत्र्यांसोबत फिरणाऱ्या मिरजेच्या मकरंदभाऊंचा गट, सुरेशभाऊ खाडे गट, शिराळ्याच्या नाईकसाहेबांचा गट, नीताताई, बाबा सूर्यवंशी, राजाराम गरूड वगैरेंचे उपगट असं या शिस्तबद्ध पक्षाचं सांगलीत कडबोळं झालंय. सत्तेबाहेर असताना आणि सत्तेत आल्यानंतरही तेच! पण असं असलं तरी सांगलीतल्या दोन कार्यालयातून सगळी सूत्रं हलताहेत. एक गाडगीळ सराफांचं विश्रामबागेतलं कार्यालय आणि दुसरं संजयकाकांचं कार्यालय. (काकांच्या कार्यालयाचं ठिकाण निश्चित नाही. कधी ते गणपती संघात, कधी राजवाडा चौकातल्या माडीवर, कधी हॉटेलवर, तर कधी तांबवेकरांच्या ‘सुखरूप’मध्ये असतं.) तसं भाजपचं मुख्य कार्यालय कधीचंच बंद झालंय. गाडगीळ सराफांच्या ‘कार्पोरेट आॅफिस’मधूनच सध्या कारभार चालतोय. काहींना ही दोन्ही ठिकाणं वर्ज्य. त्यामुळं ही मंडळी टिळक स्मारक परिसरातल्या कट्ट्यावर बसलेली दिसतात. ‘अच्छे दिन’ आले नसल्यानं ती विमनस्कपणे बसलेली दिसतात, असं काही नतद्रष्ट म्हणतात, ते जाऊ द्या!
तर या सगळ्या कार्यालयांत म्हणे दोन दिवसांपासून एक पाटी दिसायला लागलीय... ‘इथं साधनशुचितेच्या गप्पा मारत बसू नये. त्यासाठी गावभागातली निवांत जागा शोधावी!’ (अस्सल पुणेरी वळणाची पाटी.) परिणामी तिथं येणारी मंडळी बावचळायला लागलीत. कारणच तसं घडलंय ना. संजयकाकांच्या पैलवानांनी आबांच्या माणसांसोबत तासगावात राडा केला. तुंबळ हाणामारी. सात-आठ वर्षांपूर्वी जशी डोकी फुटायची, तशी फुटली. या राडेबाजीबद्दल सगळीकडंनं विचारणा होऊ लागली. काही आगंतुक, खवचट नग या दोन्ही कार्यालयात येऊन मुद्दाम ‘शिस्तबद्ध‘, ‘साधनशुचिता’ असे अवघड शब्द उच्चारू लागले. (अर्थात काकांच्या कार्यालयानं यापूर्वी ते ऐकलेले नव्हतेच म्हणा!) त्यातच तासगाव बाजार समितीचा निकाल उलटा लागला. नाक कापलं गेलं. ‘किती ही पक्षाची अवनती!’ ‘हे निश्चितच अशोभनीय आहे हं!’ ‘आपण अधोगतीकडं चाललोय हं!’... असं काहीजण अनुनासिक स्वरात कुजबुजू लागले. (काय बिशाद आहे, काकांबद्दल मोठ्यानं बोलायची!) विचारणा वाढली, कुजबूज पसरू लागली. अखेर त्या वैतागानं तात्या बिरजे, विश्रामबागचे इनामदार यांनी गाडगीळांच्या पॉश कार्यालयात, तर तांबवेकर भाऊ, गुजर वकील यांनी संजयकाकांच्या कार्यालयात ‘साधनशुचितेच्या गप्पा मारत बसू नये’, अशा पाट्या लावून टाकल्या...
तिकडं काँग्रेसच्या कार्यालयात राजूभाई शेट्टी आणि खोतांच्या सदाभाऊंची वर्दळ वाढलीय. (आधी ते प्रतीकदादांकडं मागच्या दारानं येत होते.) बाजार समितीच्या इलेक्शनमध्ये जयंतरावांच्या ‘जेजेपी’ला विरोध म्हणून त्यांनी उघडपणानं काँग्रेसच्या हातात हात घातलाय. वरच्या पातळीवर ‘नमो-नमो’ आणि इथं मात्र ‘पमो-पमो’ (पमो : पतंगरावांची मोट). त्यातनंही सदाभाऊंना ‘लाल दिवा’ खुणावतोय. ‘लाल दिव्याची गाडी आली की, जंगी आकाडी करू; पण जरा जयंतराव साहेबांकडं वशिला लावा, वर बोलायला लावा’, असं साकडं त्यांनी दिलीपतात्यांना घातलंय म्हणे! (वाळव्यात शिरलेल्या चोरट्यांनी अफवांचा बाजार मांडलाय, अशी सारवासारवी सदाभाऊ करतीलच, नेहमीप्रमाणं!) काँग्रेसवाले मात्र साधनशुचितेच्या चकाट्या कधीच पिटत नाहीत. आधीचं जाऊद्या, आताचंच उदाहरण घ्या. विटा बाजार समितीत मोहनशेठ दादांनी शिवसेनेच्या अनिलभाऊंसोबत चक्क भाजपच्या पृथ्वीराजबाबांनाही जवळ केलंय. आता पतंगरावांच्या आणि मोहनशेठच्या गटाचं पृथ्वीराजबाबांशी किती जुळतं, हे अख्खा जिल्हा जाणतो. पण ‘स्थानिक आघाडी’च्या नावाखाली सगळं खपतं. यालाच राजकारण म्हणायचं.
जाता-जाता : इस्लामपूरकरांच्या मार्गदर्शनाखाली तासगावच्या बाजार समितीत राष्ट्रवादी अर्थात आबांची माणसं ‘बाहुबली’ ठरली. रिचार्ज झाली. त्यांनी विजय साधेपणानं साजरा केला तरी ‘काढ पुंगळी, उडीव गुलाल’ अशी पोस्ट व्हॉटस् अ‍ॅपवरून फिरू लागली... बिचाऱ्यांनी बहुदा ’बाहुबली’ पाहिला नसावा... त्यात बाहुबलीला त्याच्या जवळच्या माणसानंच म्हणजे कटप्पानं मारलं होतं... विश्वासघातानं! आता या सिनेमातला कटप्पा कोण, हे फक्त शहाण्या-सवरत्यांनाच कळलं असेल... या कटप्पाचं राजकारण तर साधनशुचितेपासून कोसो मैल दूर आहे. प्रत्येक निवडणुकीत तो साधनशुचितेचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतो म्हणे...

श्रीनिवास नागे

Web Title: Instrument chat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.