व्हाट्स ग्रुपवर बदनामी करणारा मजकूर टाकणे भोवले!
By Admin | Published: July 6, 2016 01:40 AM2016-07-06T01:40:25+5:302016-07-06T01:40:25+5:30
व्हाट्स ग्रुप अँडमिनसह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल; राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची केली होती बदनामी.
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी तसेच नेते सदाभाऊ खोत यांना 'हरवले आहे' अशाप्रकारचे बदनामीकारक वृत्त व्हॉटस् अँपवरून पसरविल्याप्रकरणी 'युवा प्रतिष्ठान शेंदुर्जन'या व्हॉटस् ग्रुप अँडमिनसह चार जणांविरुद्ध ५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणा चंद्रशेखर चंदन यांनी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून या तक्रारीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चिखली येथील पदाधिकारी भारत वाघमारे तसेच विठ्ठल चव्हाण यांच्या मोबाईलच्या व्हॉटस् अँपवर आलेल्या एका पोस्टमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व आमदार सदाभाऊ खोत यांच्या फोटोसह बदनामीकरणारे वृत्त व्हॉट्स ग्रुपवर पोस्ट करण्यात आले होते. सदर बदनामीकारक वृत्ताची पोस्ट 'युवा प्रतिष्ठान शेंदुर्जन' या व्हॉटस् अँप ग्रृपवरून अनेक व्यक्तींनी ते वृत्त पुढे फारवर्ड केले.
उपरोक्त तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये 'युवा प्रतिष्ठान शेंदुर्जन' या व्हॉटस् अँप ग्रुपचे अँडमिन नकुल शिंगणे रा. शेंदुर्जन, बुलडाणा येथील डॉक्टर गजानन पडघान, चिखली येथील शेतकरी संघटनेचे समाधान कणखर तसेच ग्रामसेवक सतीश निकम यांच्याविरुद्ध आधुनिक तंत्रज्ञान कायदा ६६ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.