शेतकऱ्यांसाठी मुंडेंच्या नावे विमा योजना
By admin | Published: November 25, 2015 03:34 AM2015-11-25T03:34:49+5:302015-11-25T03:34:49+5:30
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावे शेतकरी अपघात विमा योजना चालू वर्षापासून राबविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला
मुंबई : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावे शेतकरी अपघात विमा योजना चालू वर्षापासून राबविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विमा हप्त्याची रक्कम दिल्यापासून १२ महिने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. या योजनेसाठी आवश्यक निधी वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली.
या योजनेचा लाभ सात-बारावरील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वर्षे वयोगटातील राज्यातील १ कोटी ३७ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेची मुदत ३० नोव्हेंबर रोजी समाप्त होत असल्याने ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी २७ कोटी २४ लाख ९३ हजार रुपयांचा विमा हप्ता भरण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
अशी मिळेल भरपाई
शेतकऱ्यांना केव्हाही अपघात किंवा अपंगत्व आले तर या योजनेचा लाभ मिळणार आहे. विमाधारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी, तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या जीवितहानीसाठी दोन लाख रुपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रु पयांची नुकसानभरपाई मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नसेल.
सर्व खातेदार शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासन भरेल.
यापूर्वी शेतकऱ्यांनी वा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध असणार नाही.
मृत शेतकऱ्यांची पत्नी, शेतकरी महिलेचा पती, अविवाहित मुलगी, आई, मुले, नातवंडे, विवाहित मुलगी या योजनेचे लाभ घेण्यासाठी वारसदार ठरणार आहेत.
विम्याचा दावा प्राप्त करण्यासाठी अपघातग्रस्ताच्या नावाचा समावेश असलेला सात-बारा, फेरफार नोंद, वारसाची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे यांची आवश्यकता असेल.
शेती करताना होणारे अपघात, रेल्वे, रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसणे, वीज पडणे, खून, उंचावरून पडून अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या खाण्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, दंगल, अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यास या योजनेचा लाभ दिला जाईल.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाला मुंडेंचे नाव द्या : शिक्षक परिषदेची मागणी
मुंंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. मुंडे यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबरला ही घोषणा करावी, अशी मागणी परिषदेने केली आहे.
विद्यापीठाचे नामकरण ‘लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ असे करावे, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. हा प्रस्ताव ३१ आॅगस्ट २०१५ ला विद्यापीठास पाठविण्यात आला होता. विद्यापीठाच्या २८ आॅक्टोबरला झालेल्या बैठकीत शासन जो निर्णय घेईल, त्यास मान्यता असल्याचे सांगत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे शासनाने तातडीने हा निर्णय घ्यावा, अशी मागणीही मोते यांनी केली आहे.