मंत्री-आमदारांना संघविचारांचे बौद्धिक
By admin | Published: December 19, 2014 12:54 AM2014-12-19T00:54:01+5:302014-12-19T00:54:01+5:30
विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र
संघ स्मृतिमंदिरात ‘ओळखपरेड’ : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले मार्गदर्शन
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक मंत्रीदेखील उपस्थित होते. संघाचे जेष्ठ पदाधिकारी शहरात नसल्याने यावेळी नवीन आमदारांची स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर ‘ओळख परेड’ झाली. शिवाय त्यांना संघ विचारधारेसंदर्भात बौद्धिकदेखील घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संघातर्फे डिसेंबरच्या सुरुवातीलाच मंत्रिमंडळासाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु यामुळे नवीन वाद निर्माण होऊ नये म्हणून ऐनवेळी हा वर्ग रद्द करण्यात आला. अखेर शुक्रवारचा मुहूर्त संघस्थानाच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ८.३० नंतर आमदार व मंत्री स्मृतिमंदिर परिसरात येण्यास सुरुवात झाली.
संघभूमीत ‘फोटोसेशन’ करण्याचा उत्साह
अनेक आमदारांची संघ स्मृतिमंदिर परिसरास प्रथमच भेट दिली. अनेकांना संघाच्या नेमक्या कामकाज प्रणालीची माहिती नव्हती. या सर्वांमध्ये त्यामुळे प्रचंड उत्सुकता दिसून येत होती. सकाळच्या थंडीतदेखील अनेकांनी आवर्जून ‘फोटोसेशन’ करून घेतले. शिवाय संघ स्वयंसेवकांप्रमाणे स्वहस्तेच शिस्तीत रांग लावून नाश्ता घेतला.
मंत्र्यांचीदेखील उपस्थिती
संघ स्मृतिमंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांचादेखील समावेश होता. यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.