ओडिशापेक्षा कोकणातील वादळाची तीव्रता कमी; दरेकरांच्या अजब तर्काने कोकणवासिय संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 01:35 AM2020-07-01T01:35:53+5:302020-07-01T01:36:15+5:30
अजब तर्क : कोकणातील जनतेमध्ये विधानामुळे रोष
रायगड : ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे झालेल्या वादळाची तीव्रता कोकणातील वादळापेक्षा अधिक आहे, असा अजब तर्क विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लावला. दरेकर यांच्या विधानामुळे कोकणातील जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी नुकसानग्रस्त जिल्ह्याची पाहणी करुन पुनर्वसनाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निसर्ग चक्रीवादळातील मदत जाहीर होण्यास उशीर झाल्याबाबत कबूली दिली. मात्र भाजपाच्या नेत्यांनी मागणी केल्यामुळे केंद्रीय पथक आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रवीण दरेकर यांनी एनडीआरएफचा निधी केंद्राचाच आहे. केंद्राकडून एक फुटकी कवडीची देखील मदत नाही या खासदार सुनील तटकरे यांच्या टीकेला दरेकर यांनी उत्तर दिले. केंद्र सरकार मोठा गोष्टींमध्ये मदत करीत असते, लहान गोष्टीं जिल्हा पातळीवर तसेच राज्यपातळीवरुन काम करायला हवे असे मतही दरेकर यांनी व्यक्त केले. ओरीसा, पश्चिम बंगाल येथील वादळग्रस्तांना तातडीने निधी दिला जातो याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच ओडिशाच्या तुलनेत या चक्रीवादळाचा प्रभाव कमी असल्याचा अजब तर्क लावला. यामुळे पत्रकार देखील अवाक झाले.