आंतरजातीय विवाहच जाती उदध्वस्त करेल
By admin | Published: August 5, 2014 10:35 PM2014-08-05T22:35:18+5:302014-08-05T23:20:47+5:30
कुमार शिराळकर : सांगलीतील जाती अंत परिषदेत बारा ठराव मंजूर
सांगली : आंतरजातीय विवाहच जाती-व्यवस्थेची उतरंड उद्ध्वस्त करून समाजात समानता निर्माण करेल, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य कॉ़ कुमार शिराळकर यांनी केले़
सांगलीत जाती अंत संघर्ष समितीतर्फे ‘जाती अंत परिषद’ झाली़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिराळकर बोलत होते़ परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रा़ जी़ के. ऐनापुरे होते़
शिराळकर पुढे म्हणाले की, हजारो वर्षांच्या परंपरेतून वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते़ काही कालावधीनंतर त्या परिस्थितीमध्ये बदल होतो; पण जात एवढी चिवट आहे की, ती आजही टिकून राहिली आहे़ जाती व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आवाज उठविला पाहिजे़ जातीय व्यवस्थेला आणि प्रतिष्ठेला धक्का लागेल म्हणून आंतरजातीय विवाहाला प्रचंड विरोध होत आहे़ जातीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बुध्दी आणि नीतीमत्ता यांची जोड असणारी माणसं पुढे आली पाहिजेत़ आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले तरच जातीव्यवस्था संपण्यास मदत होणार आहे़
प्रा़ डॉ़ बाबूराव गुरव म्हणाले की, जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेचा पराभव करायचा असेल, तर शिक्षण व ज्ञान महत्त्वाचे आहे़ थोर संत, समाजसुधारकांपासून जाती अंताची लढाई सुरू आहे़ या लढाईस बळ देण्यासाठी विज्ञान आणि व्यवहाराच्या पायावर उभे राहण्याची गरज आहे़
कॉ़ धनाजी गुरव म्हणाले की, समाजात आजही जातीव्यवस्थेचे मुळे खोलवर रुजली आहेत़ चतुर्थ श्रेणीतील कामगार दलित आणि बहुजन समाजातीलच आहेत़ कुणीही सहजासहजी जात सोडण्यास तयार नसल्यामुळेच जातीव्यवस्थेविरोधात लढणे मोठे आव्हान आहे़ बुध्द, महावीर, फुले, शाहू महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वाचा अभ्यास करून ती तत्त्वे रूजविल्यास समाजात निश्चित परिवर्तन होऊन जाती अंत होऊ शकतो.
अॅड़ के. डी़ शिंदे म्हणाले की, मध्यमवर्गीयांच्या पोटाचा प्रश्न सुटल्याशिवाय समाजात परिवर्तन होणार नाही़ आंतरजातीय, धर्मीय विवाह हे जाती अंतासाठीचे टाकलेले पहिले पाऊल आहे़़
प्रा़ जी़ के. ऐनापुरे म्हणाले की, जाती अंत संघर्ष परिषद अत्यावश्यक असून, जाती अंताकडे टाकलेले चांगले पाऊल आहे़ पुरोगामी सर्व संघटनांनी गट-तट विसरुन जाती अंतासाठी एकत्र येण्याची गरज आहे़
यावेळी कॉ़ शैलेंद्र कांबळे, प्रा़ माधुरी देशमुख यांनीही मते मांडली़ यावेळी जिल्हा सचिव उमेश देशमुख, जाती अंत परिषदेचे निमंत्रक प्रा़ प्रताप जगदाळे, आनंद विंगकर, युक्रांदचे युवराज मगदूम, अॅड. अजित सूर्यवंशी उपस्थित होते़ कॉ़ कबीर मुलाणी यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)
आठवलेही जातीयवाद्यांच्या पंक्तीला : गुरव
दलित आणि बहुजन समाजाचे नाव घेऊन लढणाऱ्या संघटनांचे नेतेही स्वार्थासाठी जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी करीत आहेत़ खासदार रामदास आठवलेही आपल्या स्वार्थासाठी दलित समाजाच्या व्यथा बाजूला ठेवून जातीयवादी पक्षांच्या पंगतीला जाऊन बसले आहेत़ दलित, बहुजन समाजातील नेत्यांच्या या भूमिकांमुळे जाती अंत कसा होणार, अशी खंत कॉ़ धनाजी गुरव यांनी व्यक्त केली़
परिषदेतील ठराव...
दलित, आदिवासींची मालमत्ता हडप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
-अत्याचार पीडितांसाठी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी
-आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना सर्वतोपरी प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या संसारासाठी खास निधीची शासनाने तरतूद करावी़
-जातीआधारित अत्याचारांना आळा घालण्यात कुचराई करणाऱ्या व तडजोडीसाठी दबाव आणणाऱ्या धनदांडग्यांवर, पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा
-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अंदाजपत्रकीय निधीची तरतूद करून ती प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदे करावेत
-राष्ट्रीय भूमी सुधार धोरणाच्या मसुद्यात नमूद केल्यानुसार सर्व प्रकारच्या जमीन उपयोगांची पाहणी करून आणि खासगी जमिनीवरील सिलींगची मर्यादा पुनर्रचित करून भूमिहीनांना जमिनींचे फेरवाटप करावे
-पीडित व त्यांचे साक्षीदार यांच्या अधिकारांची कायद्यामध्ये व्याख्या करावी