दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 04:01 AM2017-01-28T04:01:19+5:302017-01-28T04:01:19+5:30
महामार्गावर दरोडे टाकून ट्रकमधील माल लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीस ठाणे पोलिसांनी अटक केली.
ठाणे : महामार्गावर दरोडे टाकून ट्रकमधील माल लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीस ठाणे पोलिसांनी अटक केली. टोळीचा एक साथीदार फरार झाला असून, आरोपींकडून शस्त्रांसह ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महामार्गावर लुटमार करणारा बद्रेआलम हा त्याच्या साथीदारांसह, कोनगाव सरवली एमआयडीसी येथील टेलिफोन एक्सचेंजजवळ मालाने भरलेला ट्रक लुटण्यासाठी येणार असल्याची माहिती, ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा, घटक १ चे पोलीस नाईक विक्रांत कांबळे यांना २५ जानेवारी रोजी मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला. त्या वेळी एमएच ४३ एएफ ६७७३ क्रमांकाच्या झायलोमध्ये आलेल्या टोळीची पोलिसांनी झडती घेतली. या वेळी टोळीतील एक जण पळून गेला. उर्वरित सहा आरोपींना शिताफीने अटक केली. नागपाडा (मुंबई) येथील बद्रेआलम मेहमूदआलम खान (३२), टेमघर (भिवंडी) येथील डोंगरसिंह मगसिंह राजपुरोहीत (४७), गोवंडी (मुंबई) येथील गोस सय्यद (२३), भिवंडी येथील प्रेमनाथ बबन देवळीकर (२३), तर मुंब्रा येथील मोहम्मद उमर मोहम्मद शहा (३७) आणि मोहम्मद आरिफ सराजुद्दीन खान (३२) ही आरोपींची नावे असून, डोंगरसिंह मगसिंह राजपूत हा या टोळीचा म्होरक्या आहे. तो भिवंडी येथील भंगार व्यापारी असून, दरोडे टाकण्यासाठी त्यानेच ही टोळी तयार केली होती. गुन्ह्यांसाठी वापरली जाणारी झायलो डोंगरसिंहची असून, टोळीचा संपूर्ण खर्च तोच करायचा.
दीड महिन्यापूर्वी या टोळीने औरंगाबादजवळ मसाल्याने भरलेला ट्रक लुटला होता. या दरोड्यातील जवळपास २३ लाख रुपयांचा माल, तसेच गुन्ह्यासाठी वापरलेला ट्रक असा २९ लाख ८४ हजार ५८२ रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला.
याशिवाय कसारा घाटात २९ सप्टेंबर २0१६ रोजी या टोळीने बेडशीटचा ट्रक लुटला होता. या दरोड्यातील दीड लाखाचा माल डोंगरसिंहकडून जप्त करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांतील एकूण ३७ लाख ४८ हजार ५९२ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.
बद्रेआलम याच्याविरुद्ध नारपोली, भिवंडीसह गुजरातमध्येही गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून देशी कट्टा, ३ हॉकी स्टिक्स, प्लॅस्टिकची खेळण्यातील बंदूक, गुंगीच्या २0 गोळ्या, दोरी आदी साहित्यही जप्त करण्यात आले. पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)