'इंटरसेप्टर व्हेईकल' आलं... गाडी न अडवताही वाहनचालकास घरपोच दंडाची पावती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:58 PM2019-11-18T15:58:21+5:302019-11-18T16:12:38+5:30
भरधाव वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना हेल्मेट वाहन चालवणे
मुंबई - महामार्गावरील वाहनांचा वेग व सीटबेल्ट तपासणीसाठी अत्याधुनिक इंटरसेप्टर व्हेईकल पोलीस दलात दाखल झाले आहे. चालत्या वाहनाचा वेग कॅमेरात कैद करून वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास, तसे निदर्शनास आल्यास संबंधित वाहन चालकास घरपोच दंडाची नोटीस जाणार आहे. 18 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
भरधाव वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना हेल्मेट वाहन चालवणे आणि चारचाकी मध्ये सीट बेल्ट न वापरणे, या कारणांमुळे आपघातामध्ये मरण पावणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या प्रकारावर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी वाहतूक पोलिसांना इंटरसेप्टर व्हेईकल हे वाहन दिले आहे. या वाहनांमध्ये गाडीची वेगमर्यादा, ब्रिथ एनेलायझर, काळ्या फिल्मची जोडणी मशीन या सुविधा आहेत. हे वाहन राष्ट्रीय व राज्य महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून फक्त येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणार आहे.
वाहनांमधील मशीन 100 मीटर परिसरातील 80 पेक्षा जास्त वेगमर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांचे क्रमांक कॅमेऱ्यात कैद करते. हा क्रमांक कंट्रोल रुमकडे जातो. त्यानंतर संबंधित गाडी मालकास दंडाची नोटीस घरपोच जाणार आहे. तसेच त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेशही जाईल. वाहनांना न अडवताही ही कारवाई केली जाणार आहे. वाहनचालकांनी, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास कसा होईल, याची दक्षता घ्यावी असे आवाहन पुणे विभाग, महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले.