पुणे-कोल्हापूरसाठी इंटरसिटी एक्स्प्रेस
By admin | Published: March 26, 2017 02:49 AM2017-03-26T02:49:12+5:302017-03-26T02:49:12+5:30
पुणे-कोल्हापूर अशी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे केली
कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर अशी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे केली. त्याचबरोबर कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी २५० कोटी मंजूर केले असून, त्याच्या पायाभरणीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कोल्हापुरातील राजर्षी शाहू टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात शनिवारी दुपारी पुणे-दौंड-बारामती विभागात डीईएमयू सेवेसह राज्यातील रेल्वेच्या विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे करण्यात आला.महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार प्रकाश हुक्केरी आदी यावेळी उपस्थित होते.
सुरेश प्रभू म्हणाले, की गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वे तोट्याच्या दृष्टचक्रात अडकली होती. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर व माझ्याकडे रेल्वे मंत्रालय सोपविल्यानंतर आम्ही हळूहळू मार्गक्रमण करीत अनेक छोट्या शहरांना रेल्वेच्या माध्यमातून जोडले. त्यातून विकासाचे चक्र गतीने फिरू लागले. ८ हजार ५०० कोटींचा विकास कार्यक्रम जाहीर केला. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला एक लाख ३६ कोटींचा निधी मिळाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी रेल्वेची विकास कामे मार्गी लागतील. (प्रतिनिधी)
रेल्वेचा खर्च कमी व उत्पन्नवाढीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यंदा ४००० कोटींची बचत करण्यात आली असून, वीज निर्मितीमधील खर्च कमी करण्यात आला आहे. येत्या दहा वर्षांत ४१ हजार कोटींची बचत करण्याचे नियोजन आहे. - सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री.