हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:09 PM2020-06-23T16:09:36+5:302020-06-23T17:25:50+5:30
शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
मुंबई : राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा त्यांच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढला, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 'द इनसायडर'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले.
शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेने झेंडा बदलला. तर या भेटीमागे काही रहस्य होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज ठाकरे यांना आपण जवळून ओळखता. कुणाच्या म्हणण्याने ते काही करतील असे नाही. राज ठाकरे यांना त्या-त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कुठे पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कशी भरुन काढायची हे समजते. ते कुणाच्या सांगण्यावरुन काही करतील असे वाटत नाही."
याचबरोबर, शिवसेना मोठी कधी झाली? शिवसेनेने मराठी माणसासोबत हिंदुत्वाची कास धरली, तेव्हा राष्ट्रीय पक्ष झाला. त्यानंतर राज ठाकरेंच्याही लक्षात आले की मराठी माणूस हा केंद्रबिंदू असलाच पाहिजे, पण त्याला व्यापकता दिली नाही तर, आपली भूमिका मर्यादित राहते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज ठाकरे हे माझे मित्र आहेत, मीडियाला न समजता आम्ही अनेकवेळा बोललो आहे, भेटलो आहे. मी मुख्यमंत्री असतानाही त्यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत गप्पा मारायला मजा येते. त्यांच्याकडे वेगळी माहिती, वेगळे नॉलेज असते. मी त्यांच्यावर खूप टीका केली आहे, त्यांनी माझ्यावर केली आहे."
राज ठाकरे यांच्याकडे एक वेगळा विचार आहे, त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक पद्धत आहे. माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे आले नाहीत, ते हिंदुत्वाकडे येत आहेत असे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा मी त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून समजून घेतले की नेमके त्यांच्या मनात काय आहे, त्यांचा ट्रॅक करेक्ट होता, ते योग्य दिशेने होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. तेव्हाच त्यांनी भगवा झेंडा ठरवला होता, मात्र काही कारणांनी आधीचा झेंडा आणला. पण, भगवा आधीच रजिस्टर करुन घेतला होता. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा त्यांच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.