महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अबुधाबी इच्छुक
By admin | Published: March 3, 2017 06:09 AM2017-03-03T06:09:03+5:302017-03-03T06:09:03+5:30
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी ‘अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटी’ इच्छुक आहे
मुंबई : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी ‘अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटी’ इच्छुक असून, त्यासंदर्भात या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक प्रत्यक्ष यावी यासाठी राज्य शासन व अॅथॉरिटीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांची संयुक्त कार्य समिती स्थापन करण्याचे या वेळी ठरविण्यात आले.
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग, मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती तसेच यासाठी राज्य शासन करीत असलेले प्रयत्न, गुंतवणुकीच्या विविध संधी आदींची माहिती या वेळी अबुधाबीच्या शिष्टमंडळास देण्यात आली. राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामाबद्दल व येथे गुंतवणूक करण्याबद्दल सकारात्मक विचार करणार असल्याचे धाहेरी यांनी या वेळी सांगितले. राज्यात स्मार्ट सिटी, मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे यांसारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू आहेत. चार ते पाच वर्षांत मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणुकीची हीच योग्य वेळ असून, अबुधाबीने येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी शासन व अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांचे एक संयुक्त कार्य समिती स्थापन करावी, असेही मुख्यमं^^त्र्यांनी यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)